सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; आरोग्यमंत्री काढणार ‘आरोग्य संवाद यात्रा’

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि पारदर्शक करण्यासाठी १ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ११ ऑक्टोबर : राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी १ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रा’ काढण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या उपक्रमाची माहिती दिली. १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत ही यात्रा चालणार असून, याद्वारे आरोग्यमंत्री थेट नागरिकांशी व लोकप्रतिनिधींशी संवाद साधून सरकारी आरोग्य सेवांची सद्यस्थिती जाणून घेणार आहेत.

आरोग्य संस्थांची पाहणी आणि आढावा

या यात्रेदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे. याशिवाय आरोग्य उपकेंद्रे, जिल्हा रुग्णालये, महानगरपालिका रुग्णालये आणि विशेष रुग्णालयांमधील सुविधांचा आढावा घेतला जाईल. औषधांचा पुरवठा, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि रुग्णसेवेतील अडचणी दूर करण्यावर यात प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.

शासकीय योजनांची माहिती अन् थेट संवाद

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना, मोफत डायलिसिस, सीटी स्कॅन, १०८ रुग्णवाहिका सेवा यांसारख्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. या उपक्रमाची सांगड ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाशी घातली जाणार असून, ५ डिसेंबरनंतर प्राप्त अहवालाच्या आधारे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत राज्यस्तरीय आढावा बैठक आयोजित केली जाईल.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!