दैनिक स्थैर्य | दि. 24 जुन 2024 | फलटण | तालुक्यातील आळजापुर येथे उजव्या किनारी कालव्याच्या साखळी 85/170 येथे आळजापुर वितरकासाठी पाइप्ड डिस्ट्रिब्युशन नेटवर्क (PDN) म्हणजेच बंदिस्त पाईपलाईन साठी 21 कोटी 18 लाख 77 हजार 354 रुपायांची तांत्रिक मान्यता प्राप्त झाली आहे. फाटा क्रमांक 37 आळजापूर, बीबी, घाडगेवाडी, माळीबेंद, सासवड 13 किलोमीटरचा फाटा आहे. नुकतीच यासाठी मुख्य अभियंता यांची सही झालेली आहे. यामुळे सदर प्रकल्पाचे टेंडर सुद्धा काही दिवसातच प्रसिद्ध होईल. यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत; त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे; अशी माहिती ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी दिली.
याबाबत ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी दिलेली अधिक माहिती अशी की; मूळ अंदाज रु. 21 कोटी 18 लाख 77 हजार 354 आळजापुर वितरकासाठी 85/170 चेनेज येथे पाईप डिस्ट्रिब्युशन नेटवर्क (PDN) बांधण्याच्या कामासाठी बलकवडी उजवा किनारा कालवा अंतर्गत मुख्य अभियंता (S.P.), जलसंपदा विभाग, पुणे यांनी तांत्रिकदृष्ट्या मंजूर केला आहे. यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते.
रणजितसिंह देणार फलटण तालुक्यावर पूर्णवेळ लक्ष
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पूर्वी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. त्यावेळी त्यांना पूर्ण लोकसभा मतदारसंघात लक्ष द्यावे लागत होते. परंतु आता रणजितसिंह हे पूर्ण वेळ फलटण तालुक्यात लक्ष देणार आहेत. भारतीय जनता पार्टी लवकरच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विशेष जबाबदारी देणार आहेत. फलटण तालुक्यात मंजूर असलेली विकासकामे ही रणजितसिंह प्रलंबित ठेवणार नाहीत. आगामी काळामध्ये नक्कीच फलटण तालुक्यातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आमदार म्हणून निवडून जाईल; असेही यावेळी प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी स्पष्ट केले.