दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । नगर । ढवळपुरी ता.पारनेर, नगर येथील अभियंता रंगनाथ भोंडवे यांची प्रादेशिक सौर ऊर्जा प्रकल्प कार्यालय पुणे येथे कार्यकारी अभियंता (स्थापत्य) म्हणून पदोन्नतीवर नेमणूक झाली. या अंतर्गत पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे कार्यक्षेत्र आहे. नवीन सरकारचे सौर ऊर्जा धोरण प्रभावीपणे राबविणे या उपक्रमातर्गंत त्यांची या पदावर नेमणुक झाली आहे. श्री. रंगनाथ भोंडवे यांची पूर्वश्रमीच्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात दुय्यम अभियंता स्थापत्य या पदावर फेब्रुवारी 1999 ला पानशेत जलविद्युत केंद्र येथे नेमणूक झाली होती. तेथेच सन 2010 पर्यंत कनिष्ठ अभियंता म्हणुन त्यांनी काम पाहिले. त्यानंतर रायगड जिल्ह्यातील उरण वायू विद्युत केंद्र येथे सन 2014 पर्यंत सहाय्यक अभियंता म्हणुन काम पाहिले. ऑगस्ट 2014 मध्ये पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीन येथील दुर्घटनेच्या वेळी त्यांची बदली जलविद्युत मंडळ पुणे अंतर्गत झाली. फेब्रुवारी 2017 मध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणुन नवीकरणीय ऊर्जा मंडळ प्रकाशभवन, सेनापती बापट रोड, पुणे येथे पदोन्नती वर पदस्थापना झाली होती.
आता कार्यकारी अभियंता स्थापत्य म्हणुन पदोन्नती वर पुणे प्रादेशिक सौर ऊर्जा प्रकल्प कार्यालयातर्गंत पदस्थापना झाली आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या नविन ऊर्जा धोरणानुसार सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीतील स्थापत्य कामे करण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे इंजि.रंगनाथ भोंडवे यांनी सांगितले.