लंपी त्वचा रोगबाबत पशुपालकांनी दक्ष रहावे


दैनिक स्थैर्य । दि. ०१ सप्टेंबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्यातील जळगाव ,अहमदनगर, अकोला,धुळे व जळगाव या जिल्ह्यांमधील 35 गावांमध्ये लंपी त्वचा रोग या रोगाचा प्रादुर्भाव आढळला आहे. या अनुषंगाने जिल्यातील पशुपालकांमध्ये सदर आजाराबाबत जनजागृती करणे अत्यावश्यक आहे.

लंपी त्वचा रोग हा गाई – म्हशींमध्ये होणारा विष्णुजन्य आजार असून या आजारात जनावरास प्रथम तीव्र स्वरुपाचा ताप येतो त्यानंतर डोळ्यातून पाणी व नाकातून स्त्राव येणे सुरु होते. लसीकाग्रंथींना सुज येते. जनावराची भुक मंदावून दुध उत्पादन कमी होते .जनावराचे डोके, मान,पाय ,पाठ मायांग,कास इ.भागावरील त्वचेबर हळु हळु 1 ते 5 से.मी.व्यासाच्या गाठी येतात. काही वेळा तोंडात, नाकात व डॊळ्यात व्रण येतात .तोंडातील व्रणांमुळे जनावरास चारा चघळ्ण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो. डोळ्यातील व्रणांमुळे चिपडे येऊन पापण्या चिकटुन दृष्टी बाधीत होते.या आजारात जनावराला फुफुसदाह स्तनदाह देखील होतो.फुफुसदाह झाल्यामुळे जनावराला श्वसनास त्रास होतो व धाप लागते. रक्तातील पांढ-या पेशी व प्लेटलेट्स कमी होतात त्यामुळे जनावराला अन्य जीवानूजन्य आजार होण्याची शक्यता वाढते.पायावर सुज आल्याने जनावर लंगडते.

लंपी त्वचा रोग आजाराचा प्रसार हा प्रामुख्याने माश्या,गोचीड ,चिलटे यांच्यामार्फ़त एका जनावराकडुन दुस-या जनावरास होतो निरोगी जनावराचा रोगी जनावराच्या रोगी जनाराशी संपर्क झाल्याने देखील रोगाचा प्रसार होतो. रोगी जनावराच्या नाकातील तोंडातील डोळ्यातील स्त्रावामध्ये गर्भपात झालेल्या जनावराच्या गर्भपात स्त्रावामध्ये देखील विषाणु असतात त्यामुळे   बाधीत जनावराच्या स्त्रावांसोबत निरोगी जनावराचा संपर्क आल्यास निरोगी जनावरालाही हा रोग होऊ शकतो. या रोगाचा पसरण्याचा दर हा 10 ते 20 टक्के असुन काही वेळा 45 टक्के पर्यंतही असतो. मृत्युदर 1 ते 5 टक्यापर्यंत आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी खालीलप्रमाने उपाययोजना करावयाच्या आहेत.

 लंपी त्वचा रोगाचे नियंत्रण :

१ . या रोगाचा प्रादुर्भाव सहसा मानवास होत नाही. बाधीत जनावर हाताळणा-या पशुवैद्यकाने, शेतक-याने जैव सुरक्षा साधनांचा उपयोग करावा. हातात रबरी हातमोजे घालावेत. बाधीत जनावराच्या दुधाची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. दुध नेहमीच उकळून थंड केल्यावर पिण्यास वापरावे. दुध पाच्छाराईस करुन वापरावे.

२. साबण, डेटॉल, अल्कोहोल मिश्रीत निर्जंतूकीकरण द्रावणाचा, हात निर्जंतूकिरण करणेसाठी वापर करावा.

३ .  गोठा परिसर स्वच्छ व हवेशीर ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही, दुर्गंधी होणार नाही व किटक येणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी.

४. शेण खोल खड्यात अगर गोबर गॅस टाकीत टाकावे.

५. गोमुत्र शोषखड्यात सोडावे.

६. किटक नाशकांचा जनावरांवर, गोठ्यात व परिसरात वापर करावा.

७. आजारी जनावरांना व त्यांच्या संपर्कातील जनावरांना Ivermectin Injection दिल्याने किटकांचे नियंत्रण होते परिणामी या रोगाचे नियंत्रण होते असे दिसून आलेले आहे.

८. सद्यस्थितीत भारतात लंपी त्वचा रोगाची लस उपलब्ध नाही. शेळ्यांची कॅप्रीपॉक्स (उत्तर काशी स्ट्रेन) लस वापरुन या रोगाचे नियंत्रण करता येते. साथ रोग सुरु असताना बाधित गावांत व ५ कि.मि त्रिज्येच्या क्षेत्रातील गावांत लसीकरण करण्यात यावे. केवळ निरोगी जनावरास लसीकरण करावे. लसीकरण करताना प्रत्येक जनावरासाठी नविन सुई वापरावी.

९. आजारी जनावराचे निरोगी जनावरांपासून विलगीकरण करावे.

१०. आजारी व निरोगी जनावरे एकाच ठिकाणी चरावयास अगर पाण्यावर सोडू नयेत.

११. डास, चावणा-या माश्या, चावणारे किटक इ. दुर करणारी अनेक नैसर्गिक औषधे व फ्लाय फ्रायर यंत्र यांचा वापर करावा.

१२. गोठ्यात पहाटे व सायंकाळी डास मोठ्या प्रमाणात शिरकाव करतात, अश्यावेळी मडक्यात सुके शेण जाळून धुर करावा. अश्यावेळी निलगिरी तेल, कापूर, भांबरुड झुडुपाची पाने, करंज तेल, कडुनिंब तेल, गवती चहाची पाने इ. चा वापर केल्यास डास गोठ्यातून दुर पळून जातात.

१३. जनावरांना चरायला सोडण्यापूर्वी अंगावर करंज तेल, कडूनिंब तेल लावल्यास किटक चावत नाहीत.

१४. साथ रोग सुरु असताना महिष वर्गीय जनावरे गोवर्ग जनावरांपासून स्वतंत्र बाधावीत.

१५. साथ रोग सुरु असताना १० कि. मि त्रिज्येच्या क्षेत्रातील जनावरांचे बाजार बंद करावेत, जनावरांचे मेळावे व प्रदर्शने आयोजित करु नयेत.

१६. बाधीत क्षेत्रातील जनावरांचे गोठे, परिसर, खाद्य भांडी, पाणी भांडी, हत्यारे, यंत्र सामग्री हि, योग्य औषधी उदा. १% क्लोरोफॉर्म, १% फॉरमॅलिन, २% फिनॉल, २% सोडियम हायपो क्लोराईड, आयोडीन द्रावण, इ. चा वापर करुन निर्जंतूक करावे.

१७. या रोगाची लक्षणे दाखवणारे जनावर आढळून आल्यास पशुपालकाने, ग्रामसेवकाने, तलाठ्याने, लोक प्रतिनिधीने अगर गावातील अन्य कोणत्याही व्यक्तीने याची खबर तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकाला दयावी. म्हणजे तातडीने पशुवैद्यकीय उपचार करणे, रोगाचे निश्चित निदान करणे, रोग नियंत्रणात आणणे, रोगाचा प्रसार रोखणे इ. कार्यवाही करणे शक्य होईल.

१८. या रोगांत मयत झालेले जनावर ८ फुट खोल खड्यात शास्त्रोक्त पध्दतीने पुरावे.

१९. ज्या गावामध्ये या रोगाने बाधित जनावरे आढळतील त्या गावातील पशुंची खरेदी विक्री काही कालावधीसाठी बंद करण्यात यावी.

२०. आजारी जनावरांचा पशुवैद्यकाकडून दैनंदिन उपचार करुन घ्यावे.

२१. सातारा जिल्हायातील सर्व पशुपालकांना अवाहन करण्यात येते की, आपल्या पशुमध्ये लंपी त्वचा रोगाची लक्षणे दिसल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

संकलन

जिल्हा माहिती कार्यालय, सातारा


Back to top button
Don`t copy text!