अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यात विद्रोह व बंडखोरीचे दर्शन घडते – ताराचंद्र आवळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
माणसाचे मोठेपण हे तो कोणत्या जातीत जन्माला आला, यावर ठरत नसून त्याच्या कार्यकर्तृत्वावर ठरत असते. काही माणसे ही जगावेगळी असतात, ती कायम स्मरणात राहतात. असेच थोर व्यक्तिमत्त्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीने साहित्यिक क्षेत्र सुगंधित केले. त्यांना सामाजिक समता मान्य होती. ती त्यांना समाजात दिसली नाही. त्यामुळे त्यांच्या साहित्यात विद्रोह व बंडखोरीचे दर्शन घडते, असे विचार व्याख्याते व ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी अंदोरी (ता. खंडाळा) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर वाई-खंडाळ्याचे ज्येष्ठ नेते मिलिंद पाटील, सरपंच सौ. सोनाली बोडके, शामराव धायगुडे, काशिनाथ धायगुडे, पत्रकार सुशील गायकवाड, माजी सरपंच सौ. वंदना भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, वीर लहुजी वस्ताद साळवे, महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव अण्णाभाऊ साठे यांच्यावर होता. बालवयात जातीयतेचे चटके बसल्यामुळे बंडखोर अण्णाभाऊ साठे यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. त्यांचा रशिया प्रवास जीवन बदलून टाकणारा होता, पण त्यांना म्हणावा असा न्याय मिळाला नाही. जग बदलायची ताकत शब्दात असते, याचे मर्म त्यांना सापडले. त्यांनी कथा, कादंबरी, कविता, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन, छक्कड अशा विविध साहित्य प्रकारात लिखाण करून एक वेगळा ठसा उमटवला आहे. सामाजिक समता प्रस्थापित व्हावी, असे त्यांना वाटत होते. त्यासाठी त्यांनी विविध कार्यक्रमात परखड विचार मांडले. पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून ती कष्टकरी, कामगार, शेतकरी, दलित यांच्या तळहातावर तरली आहे, हे त्यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी ग्रामपंचायत ठराव घेऊन पत्रव्यवहार करण्याचे व तरुणांनी मोबाईलमध्ये अडकून न पडता वाचनसंस्कृती वाढीस लावावी, असे आवाहन केले. तसेच यासाठी प्रमुख मंडळींनी ग्रामपंचायत ठराव मंजूर करण्याचे जाहीर केले.

यावेळी नानासाहेब ननावरे, माजी सैनिक बाळासाहेब होवाळ, युवा नेते अशोक धायगुडे यांची भाषणे झाली.

प्रारंभी महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन किरण भिसे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कैलास भिसे, अविनाश सपकाळ, राजेश भिसे, संकेत भिसे, हणमंत भिसे तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!