सर्व धर्मियांची मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण


 

स्थैर्य, फलटण, दि.१९ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या 7/8 महिन्यापासून बंद असलेली सर्व धर्मियांची मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून दर्शनासाठी भाविक विविध मंदिरात दाखल होत आहेत, तथापी मंदिरात प्रवेशासाठी वृद्धांना प्रतिबंध घालण्यात आल्याने प्रामुख्याने दर्शनासाठी नियमीत जाणार्‍या या वर्गात काहीशी नाराजी दिसून आली.

सोमवारपासून मंदिरांचे दरवाजे उघडण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर येथील नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या नियंत्रणाखालील पुरातन प्रभु श्रीराम मंदिर, सदगुरु हरिबुवा महाराज मंदिर, नागेश्‍वर मंदिर, जावली येथील जावल सिद्धनाथ मंदिरांसह अन्य सर्व मंदिरे संबंधीत व्यवस्थापनांनी रविवारी दिवसभर नियोजन करुन भाविकांना योग्य ती काळजी घेवुनच दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

दर्शनप्रसंगी भाविकांमध्ये सुरक्षीत अंतर ठेवण्यासाठी श्रीराम मंदिर प्रांगणात चौकोन आखण्यात आले आहेत, तसेच मंदिर आवारात प्रवेश करताना सॅनिटायझर व मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, देवळांबाबतचा निर्णय जाहीर होताच येथील पुरोहितांना गुरुजी आम्ही कधी यायचे अशा प्रकारे फोन करुन भाविक विविध पूजा विधींबाबत विचारणा करीत असल्याचे पुरोहितांनी निदर्शनास आणून दिले आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार येथील पुरातन प्रभु श्रीराम आणि इतर सर्व मंदिरे दिवाळी पाडव्यापासून दर्शनासाठी खुली करण्यात आली आहेत. सोमवारी पहाटे मंदिर उघडण्यात आले आहे. त्या अगोदर रविवारी नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टने कोरोना काळात कोणती काळजी घेवून मंदिरे खुली केली पाहिजेत याची माहिती घेतली असल्याने योग्य ती अंमलबजावणी केली आहे. सॅनिटायझर व सुरक्षित अंतराची दक्षता घेण्यात येत आहे.

भाविक लक्ष्मीपूजनानंतर देवदर्शनासाठी बाहेर पडतात, त्यामुळे रविवारी काही भाविक शहरात दर्शनासाठी उत्सुक असल्याचे पहायला मिळाले. गेल्या आठ महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने येथील अर्थ व्यवस्थेला खीळ बसली आहे, मात्र कालपासून शहरात चैतन्य पसरले आहे. मंदिरावर अवलंबून असलेल्या व्यवसायिकांनीही दिवसभर आपली दुकाने सजविण्यावर भर दिला.

प्रभु श्रीराम मंदिराच्या मुख्य दरवाजापासून चौकोन आखले आहेत तर दर्शन घेवुन झाल्यानंतर सभामंडपात बसण्यास, थांबण्यास मनाई करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागत भाविकांनी केले आहे. 

फलटण जैन व महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी संबोधण्यात येते त्या पार्श्‍वभूमीवर येथे असलेली जैन व महानुभाव पंथीयांची मंदिरे, हिंदू धर्मियांची शहर व तालुक्यातील विविध देवदेवतांची असंख्य मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली करण्यात आल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!