नरेंद्रसिंह तोमर, रामविलास पासवान यांना सविस्तर मागण्यांचे निवेदन सादर
स्थैर्य, फलटण : शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आणि साखर उद्योगांसमोर असलेले प्रश्न याबाबत केंद्र सरकारकडून मदतीची मागणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शाह यांची भेट घेतली. शेतकरी-साखर उद्योगांच्या समस्यांबाबतच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन ना. अमित शाह यांनी दिले आहे. यानंतर केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रामविलास पासवान यांची भेट घेऊन यासंदर्भातील मागण्यांचे सविस्तर निवेदन त्यांना सादर करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्रातील शेती व साखर उद्योगाबाबत व त्या सोबतच कोरोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांनी सविस्तर माहिती ना. अमित शाह, ना. नरेंद्रसिंह तोमर, ना. रामविलास पासवान याना दिली.
या भेटींच्यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, विनय कोरे, धनजंय महाडिक, पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.
या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, शेतकऱ्यांना एफआरपी मिळायला हवी आणि साखर उद्योग सुद्धा चालला पाहिजे, या उद्देशातून साखर उद्योगातील अडचणी आज आम्ही अमित शाह यांच्यापुढे मांडल्या. साखर उद्योगांना पॅकेज द्यायला हवे, अशी मागणी केली. एमएसपी, कर्जाचे पुनर्गठन, सॉफ्ट लोन अशा अनेक मागण्या आम्ही केल्या. केंद्र सरकारने अतिशय चांगले इथेनॉल धोरण तयार केले आहे. त्याच्या विस्तारासंदर्भात सुद्धा यावेळी चर्चा केली. शेतकऱ्यांना एफआरपी मिळावी म्हणून एमएसपीत वाढ करण्यासंदर्भातील मागणी केली. केंद्र सरकारकडून साखर उद्योगांसाठी काही चांगले निर्णय लवकरच घेतले जातील, अशी मला पूर्ण आशा आहे.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील कोरोना स्थितीसंदर्भात माहिती सुद्धा त्यांना दिली. या भेटीत कुठलाही राजकीय अजेंडा नव्हता. राज्यातील सरकार पाडण्यात आम्हाला कुठलाही रस नाही. शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात सुद्धा यावेळी चर्चा केली. श्री अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असल्याने महाराष्ट्रासह देशातील सर्वच राज्यांतील कोरोनाच्या स्थितीवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. हे खरे आहे की, महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय्. तुमची भाजपाच्या संसदीय समितीवर निवड झाली आहे काय, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टीची नवीन कार्यकारिणी अजून तयार झाली नाही. आधी कार्यकारिणी तयार होईल, नंतर संसदीय बोर्ड तयार होईल. तसेही संसदीय बोर्डात कुणाला घ्यायचे आणि कुणाला नाही, याचा निर्णय आमचे अध्यक्ष आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते घेतील. अद्याप कोणतीही नियुक्ती झालेली नाही.