फलटणमधील दुकाने चालू ठेवण्यास परवानगी द्या; व्यापारी महासंघाचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांना निवेदन


स्थैर्य, फलटण, दि. ०७ : गेल्या वर्षभरात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे फलटण शहरातील बाजारपेठ अधिककाळ बंद राहिल्याने व्यापारी, छोटे व्यावसाईक, हातगाडीवाले, वडापाव वगैरे तत्सम खाद्यपदार्थ विक्रेते त्याचप्रमाणे येथे काम करत असलेले कर्मचारी वर्ग त्या सोबतच रिक्षा, माल वाहतुकीचे वाहनधारक यांच्यासह सर्व घटकांचे मोठे नुकसान झालेले आहे. फक्त अत्यावश्यक दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितलेले आहे. या आदेशामुळे फलटण तालुक्यातील व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. तरी फलटण तालुक्यातील व्यावसायिकांना कडक निर्बंध लागू करून व्यवसाय सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी फलटण व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

व्यापारी महासंघाच्या माध्यमातून शहरातील कापड, स्टेशनरी, कटलरी, फर्निचर, खेळणी, सौंदर्य प्रसाधने व महिलांविषयक वस्तूंची दुकाने, बांधकाम साहित्य, पुस्तक व शालेय स्टेशनरी, सराफ, मोबाईल विक्रेते, ऑटोमोबाईल, गरज, हार्डवेअर, प्रिंटींग प्रेस, फॅब्रीकेशन वगैरे विविध प्रकारचे व्यावसाईक व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याची आग्रही मागणी केलेली आहे. फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी मागील वर्षी लॉक डाऊन व अन्य सर्व सूचनांचे पालन करुन प्रसंगी नुकसान सोसून व्यापार व्यवहार बंद ठेवलेले होते. तसेच मागील लॉकहाऊन काळात काही कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप, शहरात शासन / प्रशासन व नगर पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या अन्न छत्राना सहकार्य किंवा करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविताना सहकार्याची भूमिका येथील व्यापाऱ्यांनी व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था / संघटनांच्या माध्यमातून केलेली आहे.

व्यापारी, बांधकाम क्षेत्रे, ऑटोमोबाइल गरज तसेच विविध व्यवसायांच्या ठिकाणी अनेक कामगार काम करीत असून आज त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील व्यापारी दुकाने, ऑटामोबाईल गैरेज, बांधकाम क्षेत्रातील कामे, इतर व्यवसाय दैनंदिन ठराविक कालावधीत किंवा एक आड एक दिवस पूर्ण सुरु करण्यास परवानगी देण्याची विनंती फलटण व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आलेली आहे. मे महिन्याची सुट्टी लक्षात घेऊन अनेक व्यापाऱ्यांनी लहान मुलांची खेळणी व अन्य साहित्याची मोठी खरेदी केलीली आहे. गुढी पाडवा, अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर लोक चार चाकी / दुचाकी वाहने खारेदी करतात त्याचा मोठा स्टॉक सदर व्यापाऱ्यांनी केला आहे. अनेक बांधकामे पूर्ण करून वरील सणाच्या पार्श्वभूमीवर त्याचा ताबा देण्याची प्रथा असल्याने त्यामध्ये बांधकाम व्यावसाईकांनी केलेली गुंतवणूक वगैरे सर्व व्यापाऱ्यांनी केलेली खरेदी / गुंतवणूक अडकून पडली आहे. सदर व्यापाऱ्यांचा बाकीच्या वसुलीसाठी तगादा सुरु आहे. दुकाने बंद असली तरी जागा भाडे, वीज बिल, म्युनिसिपल कर वगैरे खर्च सुरु आहेत त्यातून व्यापारी मेटाकुटीला आला असल्याने बाजारपेठ सुरु होऊन चलन फिरण्याची आवश्यकता आहे. त्यातून व्यापारी आणि त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य घटकानाही दिलासा मिळणार असल्याने फलटणची बाजारपेठ त्वरित सुरु करावी, अशी आग्रही मागणी व्यापारी महासंघाने केलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!