अफझल खान कबर परिसर पर्यटकांसाठी खुला करा; माजी आमदाराची प्रशासनाकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.२२: प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफझल खान व सय्यद बंडाच्या कबरीचा परिसर तातडीने पर्यटकांना पाहण्यासाठी खुला करावा, अशी मागणी नुकतीच श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनाही निवेदन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, “अफझलखान वधाच्या दिनानिमित्त सुमारे 17 वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जातो. गडाच्या पायथ्याशी झालेल्या शिवप्रतापामुळे तरुणांना राष्ट्रीय विचार व दहशतवाद्यांविरोधात लढण्याची प्रेरणा मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गडकिल्ल्यांवर येतात, तरीही गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफझखानाच्या कबरीच्या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात येतो. त्यामुळे शिवप्रतापाचा इतिहास पाहण्यापासून शिवभक्तांना वंचित ठेवण्यात येते. त्यामुळे कबर खुली करण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ठोस भूमिका घेऊन लवकरच निर्णय घ्यावा.” 

अफझलखानाच्या पायथ्याशी सुरू असलेले उदात्तीकरण थांबविण्यासाठी श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने शिवभक्तांचे आंदोलन उभे केले होते. याची दखल घेऊनच अफझल खानाच्या कबरीचा परिसर बंद करण्यात आला होता. मात्र, आता शिवरायांचे शौर्य पाहण्यापासून कोणत्याही समाजाचा विरोध राहणार नसल्याने प्रशासनाने तत्काळ कबरीचा परिसर खुला करावा, अशी मागणी त्यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांची भेट घेणार 

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफझल खान व सय्यद बंडाची कबर खुली करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देऊन कबर खुली करावी, अशी मागणी करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!