
दैनिक स्थैर्य । 25 जून 2025 । फलटण । येथील प्रसिद्ध शिक्षिका आणि प्रसिद्ध ज्योतिषतज्ञ कै. सौ. उषा दाणी-विभुते यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘उषःकाल सन्मान 2025’ अॅड. विश्वनाथ टाळकुटे व डॉ. हेमंत बेडेकर यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खंडाळा येथील ज्येष्ठ विधिज्ञ बाळासाहेब पंडीत होते. अध्यक्षस्थानी प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पुजन झाली.
यावेळी अॅड. विश्वनाथ टाळकुटे यांना अॅड. श्री. बाळ पंडीत व डॉ. प्रसाद जोशी यांनी उषःकाल सन्मान प्रदान केला. त्यानंतर डॉ. प्रसाद जोशी यांने डॉ. हेमंत बेडेकर यांना सन 2025 चा उषःकाल सन्मान प्रदान केला. रोख 5 हजार रूपये, श्रीफल, शाल, चुके व स्मृतिचिन्ह असे सन्मानाचे स्वरूप होते. यानंतर मुधोजी हायस्कूलमधील जीवशास्त्र विषयात (इयत्ता 12 वी) मध्ये प्रथम आलेली विद्यार्थीनी सुरूची नाळे हिला रोख 1 हजार 100 रुपये, प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन डॉ. प्रसाद जोशी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांचा सत्कार संजय पालकर, रविंद्र फडतरे, संजय चिटणीस व उषःकाल प्रतिष्ठानचे श्रीपाद विभुते यांनी शाल सत्कार केला.
अॅड. बाळ पंडीत म्हणाले, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या त्या काळात सामाजिक बांधिलकीचे शिक्षण मिळाले. सामाजामध्ये काम करताना त्याचा निश्चित उपयोग होत आहे. दाणीबाईंनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकीची शिकवण देवून अनेक विद्यार्थ्यांना तयार केले.
अॅड. विश्वनाथ टाळकुटे म्हणाले, मला देण्यात आलेला हा पुरस्कार सर्वश्रेष्ठ आहे. आयुष्याच्या जडण घडणीत माझी आई कै. सौ. मालन आणि कै. सौ.उषा दाणी यांचा सिंहाचा वाटा आहे. या दोघींनी दिलेले संस्कार, माझे सर्व सहकारी आणि माझे कुटुंबिय यांचे प्ररेणेने माऊली फौंडेशनचे काम आजपर्यंत सुरू आहे. यावेळी त्यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी 25 हजार रुपयांची मदत दिली.
डॉ. प्रसाद जोशी म्हणाले, दाणी बाईंनी वेळोवेळी बहुमोल असा सल्ला दिला. माझ्या प्रगतीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. हॉस्पीटलच्या उभारणीमध्ये त्यांनी दिलेल्या सुचना आजही मी तंतोतंत पाळत आहे. दाणी बाई आजारी असतानासुध्दा आपले दुखणे बाजुला ठेवून त्यांनी आलेल्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते.
डॉ. हेमंत बेडेकर म्हणाले, बांबु लागवड त्याच्या जाती, जगातील उत्पन्नाची ठिकाणे याची माहिती देवून शेतकर्याना या व्यवसायात येण्याचे आवाहन केले. बांबू लागवडीत चीन सध्या प्रगतीपथावर आहे. भारतातसुध्दा बांबू लागवडीचे प्रमाण हळु हळु वाढत आहे.
या कार्यक्रमात धनश्री बेडेकर लिखीत ‘शोधक-संशोधक’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. धनश्री बेडेकर यांचा शाल व गौरव चिन्ह देवून गौरव करण्यात आला. स्वधा गोसावी हिचाही गौरवचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी सुभाष देशपांडे, चंद्रशेखर दाणी, सौ. मेघा सहस्त्रबुद्धे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीपाद विभुते यांनी प्रास्ताविक केले. याचवेळी सौ. मिना बेडेकर, विश्वनाथ टाळकुटे यांचे पत्नी सौ. टाळकुटे यांचाही सत्कार सौ. मेघा सहस्त्रबुद्धे यांनी केला. सौ. दिपाली निंबाळकर यांनी सुत्र संचालन केले. ढेकळे सर यांनी आभार मानले. कु. स्वधा गोसावी हिने गायलेल्या वंदेमातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.