आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २८ मे २०२४ | फलटण |
महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

प्रशालेच्या या यशाबद्दल बोलताना मुख्याध्यापक भिवा जगताप यांनी सांगितले की, यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेत विद्यालयात विशेष गुणवत्तेसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या चांगल्या निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विद्यालयातून प्रथम तीन क्रमांक मिळवण्याचा बहुमान अनुक्रमे कु.सिद्धी प्रीतम काटे ७६.८० टक्के, कु.रेश्मा अनिल राऊत ७० टक्के, कु.सृष्टी विक्रम वाघ ६८ टक्के यांनी मिळवला आहे.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारिते बरोबरच शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे महत्व लक्षात घेऊन संस्थेचे सचिव व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जिवन कार्याचे संशोधक ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सन १९९७ पासून फलटण येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय सुरू केले.पुढे सन १९९९ मध्ये या विद्यालयाला शासन मान्यता व नंतर शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले. सुरुवातीपासून अनेक अडचणी मधून या विद्यालयाने आपली यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. या विद्यालयात शिक्षण घेणारा विद्यार्थी वर्ग हा कष्टकरी व मजूर कुटुंबातील असून परिस्थितीमुळे शिक्षणात कोणत्याही प्रकारची अडचण या विद्यार्थ्यांना येऊ नये म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग यांनी स्वीकारले आहे. या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची खाजगी शिकवणी अथवा विशेष कोचिंग नसल्याचे तसेच प्रशालेची गुणवत्तावाढ यासाठी संस्थेचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्नशील असतात तसेच त्यांचे मार्गदर्शनही वेळोवेळी मिळत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी रवींद्र बेडकिहाळ माध्यमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष सौ. अलका बेडकिहाळ, प्राथमिक विभाग शालेय समिती अध्यक्ष रवींद्र बर्गे, संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम आवटे, बालवाडी विभाग शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर पिसाळ यांच्यासह संस्थेच्या सर्व सदस्यांनी मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.


Back to top button
Don`t copy text!