दैनिक स्थैर्य । दि. १४ जुलै २०२२ । सातारा । ” घागर घेऊन ,घागर घेऊन ,घागर घेऊन निघाली,पाण्या गवळण ” , ” अबीर गुलाल उधळीत रंग ” , ” सद्गुरु वाचोनी सापडेना सोय ” , ” विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला ” ” गवळ्या घरी जातो , दही दूध खातो ” आदी भक्ती गीते व अभंगांच्या उधळणीत ज्येष्ठ नागरिक संघ सातारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भक्ती गीतांच्या कार्यक्रमात प्रत्येक अभंगा गणिक कार्यक्रम बहरत गेला.
ज्येष्ठ नागरिक संघ सातारा यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी व सभासदांनीच सादर केलेल्या भक्ती गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमेचे निमित्त साधून बुधवारी करण्यात आले होते. भक्ती गीतांच्या या कार्यक्रमात अगदी गेय पद्धतीने सादर केलेल्या भक्ती गीतांपासून ते अभंग वाचून दाखवत सभासदांनी सहभाग नोंदवला.
या भक्ती गीतांमध्ये श्लोक , अभंग, गवळण , भारुड , विठूचा गजर आदी प्रकार सादर केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वैदेही देव , उपाध्यक्ष भिकाजीराव सूर्यवंशी , कार्यवाह विजय मांडके , कार्यकारिणीचे सदस्य सुधा घोडके , सुमन डोंगरे , आशा बोडस , अलका येवले तसेच कृष्णराव चव्हाण यांनी सहभाग घेतला. तबल्याची साथ शाम नाडकर्णी यांनी दिली.
यावेळी उपाध्यक्ष ज्योती मोहिते , खजिनदार मदनलाल देवी , मायणे आदी अनेक सभासद उपस्थित होते.