दैनिक स्थैर्य | दि. १४ मे २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी, खटकेवस्ती, मठाचीवाडी, चव्हाणवाडी (गुणवरे), साठे, राजाळे गावच्या वाड्यावस्त्यांवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. मात्र, पोलिस यंत्रणा सुस्त आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवसांमुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांची लाखो रुपयांच्या चोरीच्या घटनांमुळे झोप उडाली आहे. फलटण तालुक्याच्या पूर्वभागात यापूर्वी चोरीच्या अनेक घटना घडल्या तरी तक्रार देऊनही तपास होत नाही, मग तक्रार देऊन काय उपयोग म्हणून चोरीच्या तक्रारी करण्यास न गेलेले बरे, असे अनेकजणांचे म्हणणे आहे.
चोरीचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही एकाही चोरीचा शोध लागला नाही, यावरून पोलिस यंत्रणेवरील विश्वास उडत चालला आहे. माजी आपीएस अधिकारी सुरेश खोपडे साहेब यांनी गावपातळीवर मोहल्ला कमिट्यांची स्थापना करून चोरी, मारामारी, दंगल यासारख्या घटनांना अटकाव घातला होता. मोहल्ला कमिटीची रचना करताना समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्ती, पत्रकार यांचा समावेश केला होता. महिना पंधरा दिवसांतून मोहल्ला कमिट्यांची मिटिंग घेऊन आढावा घेतला जात असे. तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख मीरा बोरवणकर यांनी जिल्ह्याच्या सीमेवर रात्रीचा बंदुकधारी पोलिस बंदोबस्त ठेवून रात्रीच्या वेळी चोरट्या मार्गाने होणारी अवैध वाहतूक, अवैध धंदे, जिल्ह्याबाहेरील येणार्या चोरट्यांना थोपविल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोर्यांचे प्रमाण रोखण्यात यश मिळवले होते. सुरेश खोपडे, मीरा बोरवणकर यांच्यासारखे पुन्हा अधिकारी लाभले नाहीत.
पोलीस खात्याकडून चोरी, मारामारी, भांडण-तंटा सोडविण्यासाठी प्रयत्न केला जात नाही, यामुळे चोरटे मोकाट सुटले आहेत. शेतकर्यांना वीज पुरवठा करणार्या डीपींची चोरी झाल्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेती पिकांचे नुकसान होत आहे.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे, हे धोकादायक ठरू शकते. लोकसभा निवडणुकीचे कारण देऊन स्टाफ कमी असल्याने मर्यादा पडतात, असे पोलिस खात्याकडून सांगण्यात येते; परंतु लोकसभा निवडणूक आता या महिन्यात आहे; परंतु चोर्यांचे प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून या भागात सुरू आहेत. याचा बंदोबस्त यापूर्वी होणे गरजेचे आहे. चोरी झाल्यावर उपाय शोधण्यापेक्षा चोरीच होणार नाही यासाठी उपाय शोधणे गरजेचे आहे.
संबंधित वरीष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी ताबडतोब वरील घटनांना अटकाव घालावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.