श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव १४ ते २५ मे दरम्यान; विविध कार्यक्रमांचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १३ मे २०२४ | फलटण |
श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर-राजेसाहेब, फलटण यांची ४६ वी पुण्यतिथी व श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांची ९९ वी जयंती मंगळवार, दि. १४ मे ते शनिवार, दि. २५ मे २०२४ या कालावधीत साजरी करीत आहोत. या कालावधीत श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजीराजे स्मृती महोत्सव होणार असून विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

स्मृती महोत्सवात श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक लि., फलटणचे संस्थापक चेअरमन श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने देण्यात येणारा ‘श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार २०२३-२०२४’ प्रदान समारंभ मंगळवार, दि. १४ मे २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होणार आहे. यावर्षीचा पुरस्कार प्रसिध्द नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार प्रदान सोहळा मुधोजी हायस्कूल रंगमंच, फलटण येथे होणार असून विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार डॉ. लहाने यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड सहकारी बँक लि. पिंपरीचे अध्यक्ष श्री. शिरीष देशपांडे असणार आहेत.

यावेळी शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगावचे आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

बुधवार, दि. १५ मे रोजी मराठी, हिंदी लोकप्रिय गीतांची बहारदार मैफिल, सोबत आकर्षक नृत्याविष्कार असलेला आकार प्रस्तुत ‘अंतरंग’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

गुरुवार, दि. १६ मे रोजी जुन्या, नव्या मराठी गीतांची सुरेल मैफल विरेंद्र केंजळे प्रस्तुत ‘साज’ हा कार्यक्रम होईल.

शुक्रवार, दि. १७ मे २०२४ रोजी प्रसिध्द वक्ते आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांचे ‘ग्राम विकासाचा आदर्श’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे असणार आहेत.

शनिवार, दि. १८ मे २०२४ रोजी लोककलेचा आविष्कार ‘शाहिरी पोवाडा’ सादर होणार असून स्टार प्रवाह फेम आविष्कार देसिंगे हा पोवाडा सादर करणार आहेत.

रविवार, दि. १९ मे रोजी ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांचे ‘भारताची एकात्मता आणि ‘मान्सून’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम असणार आहेत.

सोमवार, दि. २० मे रोजी ज्योतीराम फडतरे यांचे ‘कथाकथन’ होणार आहे.

मंगळवार, दि. २१ मे रोजी ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ हा हास्यसम्राट फेम संजय कळमकर यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.

बुधवार, दि. २२ मे रोजी जागतिक कीर्तीचे महान जादूगार शिवम व भैरव आनंद हे जादूचे प्रयोग सादर करणार आहेत.

गुरुवार, दि. २३ मे व शुक्रवार, दि. २४ मे रोजी ‘कलाविष्कार’ हा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेवक कलावंत व फलटण एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाखांतील कलावंत विद्यार्थी कार्यक्रम सादर करणार आहेत.

शनिवार, दि. २५ मे २०२४ रोजी स्मृती महोत्सव समारोप समारंभ होणार असून ‘कलाविष्कार’ कार्यक्रमाचे बक्षीस वितरण व सत्कार समारंभ होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. यावेळी आमदार दीपक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

हे सर्व कार्यक्रम मुधोजी हायस्कूल रंगमंच, फलटण येथे होणार असून सायंकाळी ६.०० वाजता कार्यक्रम सुरू होतील.

स्मृती महोत्सवातील या सर्व कार्यक्रमांचा लाभ मोठ्या संख्येने नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महोत्सवाच्या संयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!