दैनिक स्थैर्य | दि. ७ नोव्हेंबर २०२३ | फलटण |
राजुरी (ता. फलटण) परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून राजुरी गावात सोमवारी दिवसा घरफोडी करत दहा तोळे सोन्यासह रोख रक्कम लंपास केली आहे. या परिसरात चोरटे सुसाट सुटले असून दहा दिवसात त्यांची ही आठवी सगळ्यात मोठी चोरी आहे. त्यामुळे फलटण ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिल्याचे दिसत आहे.
मागील दहा दिवसांपासून चोरटे बिंधास्त चोर्या करताना दिसत आहेत. योगेश गणपत शिंदे (रा. राजुरी चौफुला) हे परिवारासह सावडणे विधीसाठी सकाळी बाहेरगावी गेले असता. सकाळी आठच्या दरम्यान कटावणीने दार उघडून दहा तोळे सोने, अकरा हजार रोख रकमेसह इतरही साहित्य चोरीस गेले आहे. वर्दळीच्या व रोडलगत ठिकाणी झालेली चोरी फलटण ग्रामीण पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे.
घरफोडीच्या ठिकाणी पोलीस निरीक्षक महाडिक, डी.बी. टीम सागर आरगडे यांनी भेट दिली असून अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत.
दरम्यान, राजुरी परिसरात चोरट्यांनी दहा दिवसात आठ चोर्या केल्यामुळे नागरिकांची सुरक्षा राम भरोसे झाल्याचे दिसत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, फलटण ग्रामीण पोलिसात केवळ एका चोरीची नोंद झाली आहे.