दैनिक स्थैर्य | दि. १३ सप्टेंबर २०२४ | फलटण |
कारखान्याला ऊस घालण्यासाठी खोट्या सह्या व संमतीपत्राची नोटरी करून फिर्यादी श्रीमती लक्ष्मी महादेव शिंदे (वय ४०, मूळ रा. रावडी खु., ता. फलटण, सध्या रा. मिरेवाडी, ता. फलटण) यांची तसेच माळेगाव साखर कारखान्याची फसवणूक केल्या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात तिघाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
केशव रामचंद्र शिंदे (मयत), किमया केशव शिंदे (वय २२) व हेमा केशव शिंदे (सर्व रा. रावडी खुर्द, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, मारवाड पेठ, फलटण येथे दि. १० डिसेंबर २०२३ ते १३ मार्च २०२४ यादरम्यान रावडी खुर्द, ता. फलटण, जि. सातारा येथील फिर्यादीची पुतणी किमया केशव शिंदे हिने स्वत:च्या नावे शंभर रुपयांचा स्टॅम्पपेपर घेऊन त्यावर फिर्यादी मुंबई येथे असताना फिर्यादीची खोटी सही करून या खोट्या सह्यांच्या संमतीपत्राची नोटरी तयार करून केशव रामचंद्र शिंदे (मयत) व किमया केशव शिंदे यांनी संगनमताने सदरची नोटरी माळेगाव साखर कारखाना येथे देऊन फिर्यादीची तसेच माळेगाव साखर कारखान्याची फसवणूक केलेली आहे. तसेच दीर केशव शिंदे (मयत) यांना या क्षेत्रातील ऊस फिर्यादीच्या नावावर न पाठविता, फिर्यादीस कोणतीही कल्पना न देता आरोपींच्या नावावर का पाठविला असे विचारले असता, फिर्यादीची मुलगी लतिका हिस दिर केशव शिंदे, जाऊ हेमा केशव शिंदे, पुतणी किमया केशव शिंदे यांनी शिवीगाळ, दमदाटी करून ‘आधी बापाला घेऊन ये, मग जमिनीचा हिस्सा देतो’ अशी धमकी दिली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. आर. शिंदे करीत आहेत.