दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२२ । सिंधुदुर्गनगरी । कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन आज पर्यटनमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर,. वैभव नाईक, जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, सरपंच चंद्रकांत घाडी, कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लबधे आदी उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनासाठी मोठा वाव असल्याचे सांगून पर्यटन मंत्री श्री ठाकरे पुढे म्हणाले की, येथील निसर्ग खूप सुंदर आहे. पर्यटन वाढीसाठी शासन कटिबध्द आहे. पर्यटकांची संख्या वाढावी यासाठीच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील.
यावेळी प्रादेशिक पर्यटन योजनेतून पूर्ण झालेल्या कुणकेश्वर मंदिरामागील रस्त्याचे खडीकरण, मंदिरा जवळील पायऱ्यांचे बांधकाम, प्रवेशद्वाराचे बांधकाम, मंदिराची संरक्षक भिंत, समुद्र किनाऱ्यावरील प्रेक्षक गॅलरी बांधकाम व मंदिर परिसरातील पेव्हर ब्लॉक या कामांचे लोकार्पण करण्यात आले.