स्थैर्य, फलटण दि. १३ : फलटण वकील संघाच्या माध्यमातून येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित रक्तदान शिबीरात न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, वकील संघ पदाधिकारी, सभासद, पक्षकार, माऊली फौंडेशन, मुंबईचे काही सदस्य, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी वगैरेंनी सहभाग घेऊन रक्तदान केले.
फलटण वकील संघाने राजमाता जिजाऊ साहेब जयंती, श्री स्वामी विवेकानंद जयंती, राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्त्य साधून फलटण मेडिकल फौंडेशन संचलित येथील रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबीराचे उदघाटन येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. सौ. यू. एम. वैद्य यांचे हस्ते करण्यात आले, वकील संघाचे अध्यक्ष अड. राहुल करणे अध्यक्षस्थानी होते. न्यायालय सहाय्यक अधिक्षक केंडे, वकील संघाचे सचिव अड. रणजित भोसले, खजिनदार अड. समीर कुंभार, सभासद व अन्य मान्यवर उपस्थित होते.
रक्ताची मागणी वाढत असताना रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने संपूर्ण राज्यभर रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत असल्याने सामाजिक बांधीलकीच्या भावनेतून वकील संघाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात सहभागी होऊन न्यायलयाशी संबंधीत सर्वच घटकांतील ५१ जणांनी रक्तदान केले त्या सर्वांचे वकील संघाच्यावतीने अध्यक्ष अड. राहुल करणे यांनी आभार मानले.