संत रोहिदास चर्मोद्योग, चर्मकार विकास महामंडळाकडील ५० टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजना


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा ।  अनूसूचित  जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इत्यादी ) आर्थिकदृष्ट्या दुर्बल व दारिद्रय रेषेखालील जीवन जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी संत रोहितदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाकडून विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाकडील योजनांचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधावी.

50 टक्के अनुदान योजना : या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत 50 हजार पर्यंत गुंतवणूक असणाऱ्या व्यवसायासाठी सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय्य दिले जाते. या अर्थ सहाय्यापैकी 10 हजार कमाल मर्यादेपर्यंत 50 टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. उर्वरित कर्जांची परतफेड 36 ते 60 समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे परतफेड करावी लागते.

बीज भांडवल योजना : 50 हजार ते 5 लाख पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजनेंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या व्याज दराने उपलब्ध करण्यात येते.

या योजनेंतर्गत 50 हजार पासून ते 5 लाखापर्यंतचा कर्ज पुरवठा प्रचलित व्याज दराने बँकेमार्फत करण्यात येते. या योजनेंतर्गत बँकेने मंजुर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी 75 टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. 5 टक्के ही लाभार्थ्यांने स्वत:चा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरीत 20 टक्के ही महामंडळा बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमेपैकी 10 हजार अनुदान म्हणून देण्यात येतात तर उर्वरित रक्कम ही 4 टक्के या व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यात येते. या योजनेंतर्गत मिळणाऱ्या कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास 36 ते 60 मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.

योजनेच्या लाभासाठी जोडवावयाची कागदपत्रे खालीलप्रमाणे.

* अर्जदाराचा जातीचा दाखला (सक्षम प्राधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा)

* अर्जदाराच्या कुटूंबाचा उत्पन्नाचा दाखला (तहसिलदार यांच्याकडून घेतलेला असावा)

* पासपोर्ट साईजचे तीन फोटो

* रेशनकार्डची झेरॉक्स प्रत

*अर्जदाराचा शैक्षणिक दाखला

* आधारकार्डची छायांकित प्रत

* ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा

* दोन समक्ष जामीनदार (नोकरदार किंवा मालमत्ताधारक/शेतकरी)

* एन.एस.एफ.डी.सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसन्स व आरटीओ कडील परवाना

* वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकींग बद्दल/किंमती बाबत अधिकृत विक्रेता कंपनीकडील दरपत्रक

* अर्जदारास व्यवसाय करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका अथवा महानगरपालिका यांचे ना हकरत प्रमाणपत्र

* व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला

* व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल

* खरेदी करावयाच्या मालमत्तेच्या साहित्याचे दरपत्रक

अनूसूचित  जातीतील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इत्यादी ) पात्र लाभार्थ्यांनी आपले उद्योग उभारणीसाठी जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग, चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सर्वे नं.22 अ, जुनी एमआयडीसी रोड, बॉम्बे रेस्टॉरंट शेजारी उड्डानपुला जवळ, सातारा येथे संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!