दैनिक स्थैर्य । दि. ०४ सप्टेंबर २०२२ । सातारा । मालगाव, ता. सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी घराची खिडकी तोडून आत प्रवेश करून ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २ सप्टेंबर रोजी १.४५ ते २.१५ वाजण्याच्या सुमारास मालगाव, ता. सातारा येथील घराच्या मुख्य दरवाजा शेजारी असणारी खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटात ठेवलेला १ लाख ५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा राणीहार, १ लाख ५ हजार रुपये किमतीची सोन्याची मोहन माळ, २ लाख १० हजार रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे दोन सोन्याचे गंठण, ३५ हजार रुपये किमतीचा एक तोळे वजनाचा सोन्याचे नेकलेस, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठीसह सोन्याचा अन्यऐवज असा एकूण ५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेण्याची तक्रार श्रीकांत राजेंद्र पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.