स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१५: नव्या कृषी कायद्यांच्या
विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. सोमवारी अनेक राज्यांतील
शेतकऱ्यांनी उपोषण केले. दुसरीकडे, चर्चेची दारे खुली आहेत, पण कायदे मागे
घेणार नाही, असा स्पष्ट पुनरुच्चार केंद्र सरकारने केला. तिकडे, शेतकरीही
कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. यूपी, बिहारसह इतर राज्यांतील १५
पेक्षा जास्त संघटनांनी कायद्यांचे समर्थन केले आहे, असा सरकारचा दावा आहे.
पण संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य शिवकुमार कक्का म्हणाले की, सरकार संभ्रम
निर्माण करत आहे, अनेक संघटना रात्रीतून उभ्या केल्या जात आहेत. अनेक
संघटनांची नावेही ऐकली नाहीत. सोमवारी जे लोक कृषिमंत्र्यांना भेटले, ते
अखिल भारतीय शेतकरी समन्वय समितीचे आहेत. दिल्ली आणि इतर राज्यांत संयुक्त
मोर्चाच्या बॅनरखाली आंदोलन सुरू असून ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह म्हणाले की, कायदे शेतकरी हिताचे आहेत, ते मागे
घेतले जाणार नाहीत. कृृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, खरे शेतकरी
नेते पुढे आले तरच तोडगा निघू शकेल.
शेतकऱ्यांना पाठिंबा देत मुलांनी सोपवला गल्ला
–
गाझीपूर बॉर्डरवर मीरतच्या चार मुलांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. ७ ते १३
वर्षांदरम्यान वय असलेल्या या मुलांनी गेल्या ४-५ महिन्यांत आपल्या
गल्ल्यामध्ये साठवलेले पैसे शेतकऱ्यांना दिले.
– एनएच-२४ वर काही आंदोलक
धरणे देत होते. शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी आंदोलकांना हायवे मोकळा
करण्याची विनंती केली. आंदोलकांनी ती मान्य केली.
– कुंडली बॉर्डरवर
निदर्शनांत पंजाबच्या मोगाचे शेतकरी मक्खन खान (४२) यांचा हृदयविकाराच्या
झटक्याने मृत्यू झाला. गेल्या १९ दिवसांत आंदोलनस्थळी १५ हून जास्त लोकांचा
मृत्यू झाला आहे.
कॅनडाकडून राजकारण
आंदोलनावर
कॅनडाची भूमिका ही थेट व्होट बँकेचे राजकारण असल्याचा आरोप माजी भारतीय
मुत्सद्द्यांनी खुल्या पत्रात केला. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे
वक्तव्य अनावश्यक, अवास्तव आणि चिथावणीखोर असल्याचे मुत्सद्द्यांनी म्हटले
आहे.
जिअोचे पत्र : आंदोलनाकडून स्पर्धकांचा खोटा प्रचार
रिलायन्स
जिअोने ट्रायला पत्र लिहून व्होडा-आयडिया व एअरटेलची तक्रार केली आहे.
जिअोच्या आरोपानुसार, ‘शेतकरी आंदोलनाचा या कंपन्या गैरफायदा घेत आहेत.
स्पर्धक कंपन्या त्यांच्या कर्मचारी, एजंट व रिटेलर्सच्या माध्यमातून
रिलायन्सविरुद्ध नकारात्मक मोहीम राबवत आहेत. यामुळे आपल्या प्रतिमेला तडा
जात आहे. ग्राहकांना लालूच दाखवून जिओतून पोर्ट करण्यास भाग पाडले जात
आहे.’