महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जानेवारी २०२३ । नवी दिल्ली । देशातील सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली.  प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना पद्मविभूषण तर उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला, सुप्रसिद्ध भारतीय सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ दीपक धर व प्रख्यात गायिका सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण तसेच  महाराष्ट्रातील अन्य आठ मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातून प्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसेन यांना संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर, प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम् बिर्ला व विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे दीपक धर यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच समाजसेवा क्षेत्रात अतुलनीय कार्यासाठी भिकू रामजी इदाते व गजानन माने, व्यापार व उद्योग क्षेत्रासाठी राकेश झुनझुनवाला (मरणोत्तर), कला क्षेत्रात गडचिरोलीतील सुप्रसिद्ध झाडीपट्टी रंगकर्मी परशुराम खुणे, प्रसिद्ध सिने अभिनेत्री रवीना टंडन व कुमी वाडिया, साहित्य व शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानासाठी साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ प्रभाकर मांडे व रमेश पतंगे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत.

या वर्षी देशातील एकूण १०६ मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर झाले. यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण आणि ९१ पद्मश्री पुरस्कार सामील आहेत. यासह  १९ महिला तर २ हे परदेशी नागरिक आहेत. ७ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत.


Back to top button
Don`t copy text!