राष्ट्रवादीचे विचार तळागळात पोहचवा : सारंग पाटील


दैनिक स्थैर्य । दि. १० जुन २०२२ । सातारा । राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सातारा जिल्ह्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी कार्यरत राहणे गरजेचे आहे. पक्षाचा कार्यकर्ता म्हणजेच पक्षाची ताकद असते. आत्ताच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सोशल मीडियावर प्रभावीपणे मांडून तळागाळापर्यंत कामकाज करणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस सारंग श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सातारा कार्यालयांमध्ये वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सारंग पाटील बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलिंद नेवसे यांच्यासह विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आता 18 वर्षे पूर्ण झालेल्या व मतदानाचा अधिकार असलेल्यांना मा. शरद पवार, ना. अजित पवार, ना. जयंत पाटील व पक्षातील नेत्यांचे कामकाजाची माहिती पूर्णपणे माहित नाही. त्यामुळे सोशल मीडियावर टीका करताना आपल्या कडूनही युवा कार्यकर्त्यांनी विरोधकांना त्याच पद्धतीने उत्तर देणे गरजेचे आहे. मा. शरद पवार, ना. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी मध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व नेत्यांनी केलेल्या कामकाजाची माहिती सोशल मीडियासह समाजामध्ये प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे असेही यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यामध्ये आपला पक्ष स्थापन झाल्यापासून पाच वर्षाचा अपवाद वगळता कायम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सत्तेमध्ये राहिलेली आहे. देशांमध्ये असे क्वचितच उदाहरण असेल ही स्थापनेपासून सतत सत्तेमध्ये असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ओळख देशांमध्येही वेगळी आहे. राज्यामध्ये व देशांमध्ये मा. शरद पवार, ना. अजित पवार यांनी केलेल्या कामकाजाची माहिती आपण प्रभावीपणे मांडणे गरजेचे आहे, असे यावेळी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील माने यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी एक दिवस राष्ट्रवादीसाठी ही मोहीम सुरू केलेली आहे. त्याला आपल्या जिल्ह्यातून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. आपल्या जिल्ह्यातून प्रतिसाद मिळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी आठवड्या मधील एक दिवस हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी साठी द्यावा व त्यावेळी पक्षाचेच काम करावे म्हणजेच आपल्या भागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेणे यांच्या घरी जाणे आणि विविध विषयांवर चर्चा करणे असे काम करणे गरजेचे आहे, असेही यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजवंदन करून राष्ट्रगीताने झाली व शेवट वंदे मातरम म्हणुन करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!