

स्थैर्य, सातारा, दि. १७ : सातारा शहरातील यादोगोपाळ पेठेतील दिवशीकर बंधू यांच्या श्री मुरलीधर मंदिरामध्ये ‘अधिक मासा’निमित्त (पुरुषोत्तम मास) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात आणि प्रांगणात करण्यात आलेली विशेष विद्युत रोषणाई, तसेच फुले, पाने आणि पताकांची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. येत्या १५ जूनपर्यंत चालणाऱ्या या पुरुषोत्तम मासामध्ये मंदिरात जप, पूजा आणि विविध उपक्रमांची मोठी रेलचेल असणार आहे. संपूर्ण देशभरातील हिंदू बांधवांकडून या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) महत्त्व
अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित असून, या काळात केलेली पूजा, जप, दान, उपवास आणि सेवा शतपटीने फळ देणारी मानली जाते.
-
३३ या संख्येचे महत्त्व: वसिष्ठ सिद्धांतानुसार अधिक महिना हा साधारणतः ३२ महिने, १६ दिवस आणि ८ तासांनी (म्हणजेच जवळपास ३३ महिन्यांनी) येतो. हिंदू धर्मात ३३ कोटी देवता असल्यामुळे या संख्येला विशेष महत्त्व आहे. म्हणूनच अधिक मासात ३३ वस्तूंचे दान, ३३ अनारसे देण्याची किंवा ३०+३ अशी परंपरा सांगितली जाते. महिना ३० दिवसांचा असल्याने, एखादे व्रत दिवसातून एकदा करत असल्यास शेवटचे ३ दिवस ते दोन वेळा करून ३३ ची संख्या पूर्ण केली जाते.
अधिक मासात भाविकांनी काय करावे?
सामान्य कौटुंबिक साधकाने हा महिना उपासना आणि विष्णू-दत्त सेवेची पर्वणी मानून खालीलप्रमाणे सेवा करावी:
-
नित्यपूजा: घरात असलेल्या विष्णू, श्रीकृष्ण किंवा दत्तांच्या प्रतिमेला रोज हार अर्पण करून शांतपणे मानसपूजा करावी.
-
मंत्रजप: रोज सकाळी स्नानानंतर किमान एक माळ “ॐ नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा. (सकाळी न जमल्यास दिवसभरात केव्हाही करावा).
-
नैवेद्य व पठण: गोपालकृष्णास रोज लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि तुळशीपत्र अर्पण करावे. तसेच रोज किमान एकदा ‘विष्णुसहस्रनाम’ म्हणावे किंवा श्रवण करावे.
-
दीपदान: रोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. तिळाच्या तेलाचा अखंड नंदादीप समयीच्या स्वरूपात लावावा. दत्त किंवा कृष्ण मंदिरात दीपासाठी तेल/तूप किंवा पैशांचे दान द्यावे.
-
सत्कर्म व दानधर्म: गुरुजींना अन्न, फळे, वस्त्र व दक्षिणा अर्पण करून आशीर्वाद घ्यावेत. दत्तक्षेत्री चालणाऱ्या अन्नदानासाठी देणगी द्यावी तसेच विद्यार्थी, गरीब आणि निराधार कुटुंबांना आर्थिक किंवा वस्तूरूपात मदत करावी.
-
विशेष याग: या महिन्यात भागवत कथा श्रवण, गोसेवा, पुरुषोत्तम याग, विष्णू याग, लक्ष्मी-नारायण याग किंवा सत्यनारायण महापूजा करावी.
(टीप: या पवित्र काळात लग्न, गृहप्रवेश यांसारखी शुभकार्ये निषिद्ध मानली जातात.)
पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिरात ‘पुरुषोत्तम याग’
सातारा शहरातील पंचपाळी हौद दुर्गा माता मंदिरातही पुरुषोत्तम मासानिमित्त विशेष ‘पुरुषोत्तम यागाचे’ आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी मंदिर ट्रस्टकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
(छायाचित्र/वृत्तांकन – अतुल देशपांडे, सातारा)