शिवसेना कुणाची, याचं उत्तर जनतेने निवडणुकीत दिलंय : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मनोज जरांगेंची नाराजी दूर होईल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२६ | बामणोली |
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील प्रकरण प्रलंबित आहे. शिवसेना कुणाची याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकीत दिले आहे. सर्वोच्च न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांची नाराजी दूर होईल, असेही ते म्हणाले. दरे येथील मुक्कामादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही भूमिका मांडली.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे गटाला भाजप किंवा अन्य पक्षात विलीन व्हावे लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना ना. शिंदे म्हणाले, आमच्यासोबत ४० आमदार होते. आज जनतेने आम्हाला ६० आमदार निवडून दिले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवली. त्यामुळे शिवसेना कुणाची, याचे उत्तर जनतेनेच दिले आहे.विरोधकांकडून सरकारला घटनाबाह्य म्हटले जात आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीच्या निर्णयात सरकार संविधानानुसार स्थापन झाल्याचे स्पष्ट केले आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे. न्यायप्रविष्ट विषयावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही. निकाल त्यांच्या बाजूने लागला तर न्यायालयाचे स्वागत करायचे आणि विरोधात लागला तर न्यायालय, निवडणूक आयोग यांच्यावर टीका करायची, ही विरोधकांची भूमिका आहे. मात्र आम्ही अशा वक्तव्यांकडे लक्ष देत नाही, असा टोलाही ना. शिंदे यांनी लगावला.

मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर व्यक्त केलेल्या नाराजीबाबत छेडले असता ना. शिंदे म्हणाले, ना. उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला असून त्याची माहिती मला दिली आहे. मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेला गती दिली, तसेच सारथी संस्था आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या. हे सर्व करताना ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली होती. या सर्व बाबींची माहिती मनोज जरांगे यांना आहे. त्यामुळे त्यांचा गैरसमज निश्चितच दूर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button
Don`t copy text!