राजुरी येथे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २४ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या घोषवाक्याखाली राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कृत विशेष श्रमसंस्कार शिबिर सन २०२३-२४ राजुरी, तालुका फलटण, जि. सातारा येथे दि. २३ ते २९ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित केले आहे. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयीन समितीचे व्हा. चेअरमन शरदराव रणवरे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक करताना राष्ट्रीय सेवा योजनेची उद्दिष्टे, स्थापना, पार्श्वभूमी व शिबिरामध्ये राबवायचे उपक्रम याबद्दल सविस्तर माहिती प्रा. सागर तरटे यांनी दिली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित असलेले फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम यांनी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे महत्त्व, ग्रामीण भागाचा विकास, मूलभूत उद्दिष्टे या विषयावर लक्ष केंद्रित केले.

श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राजुरी येथे ‘स्वच्छ गाव, समृध्द गाव’, शाश्वत व सर्वांगीण ग्रामीण विकास, ग्राम सर्वेक्षण व गावचा इतिहास, स्त्री जन्माचे स्वागत व बालविवाह बंदी, व्यसनमुक्ती व आरोग्य सवर्धन, मतदार जनजागृती अभियान, वृक्षारोपण, माती परीक्षण, रस्ता दुरूस्ती व डागडुजी, समाजप्रबोधन, पर्यावरण संवर्धन, प्लॅस्टिक व्यवस्थापन यासारखे सामाजिक जिव्हाळ्याचे व कृषी संबंधित उपक्रम शिबिर कालावधीत गावामध्ये राबविणार असल्याचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी सांगितले.

या शिबिर कालावधीमध्ये तरुण पिढीसमोरील आव्हाने व व्यसनमुक्त भारत, स्वच्छ व सदृढ भारत अभियान, व्यसनमुक्ती जनजागृती, शाश्वत जगाची निर्मिती, ग्रामीण महिलांचे सबलीकरण, पर्यावरण सवर्धन व मानवी जीवन, राष्ट्र उभारणीत युवकांचे योगदान, शेतीपूरक व्यवसाय व ग्रामीण विकास, उद्योजकता व व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या विविध विषयावर तज्ज्ञांचे व्याख्यान व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषि महाविद्यालय, फलटणचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी उपस्थितांना दिली.

श्री. जयकुमार इंगळे, अध्यक्ष, फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक हे उत्कृष्ट काम करतील, असा आशावाद व्यक्त केला व गावातील ग्रामस्थ स्वयंसेवकांना सहकार्य करतील, अशी ग्वाही दिली.

राजुरी परिसरातील ग्रामस्थ विशेष करून महिलांनी व युवकांनी या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन स्वयंसेवकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. शरदराव रणवरे यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला राजुरी गावचे सरपंच श्री. शिवाजी पवार, श्री. नितीन गांधी, मे. गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, श्री. सचिन पवार, माजी सरपंच राजुरी, ग्रामस्थ, महिला, युवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश बिचुकले व स्वंयसेवक उपस्थित होते.

आभार श्री. कांतीलाल खुरंगे, संचालक, फलटण तालुका शेतमाल व फळ प्रक्रिया उद्योग यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!