दैनिक स्थैर्य | दि. १ मे २०२४ | फलटण |
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका सर्व पदाधिकारी व सातारा जिल्हा पूर्व विभाग यांच्या सौजन्याने तसेच भीमरत्न तरुण मंडळ मुंजवडी यांच्या वतीने युवा संस्कार श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दि. २४ एप्रिल २०२४ रोजी या शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. २८ एप्रिल २०२४ रोजी भीमरत्न तरुण मंडळ मुंजवडी, ता. फलटण यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक साजरी करण्यात आली.
यावेळी पूज्य भंतेजी धम्मानंद बोधी यांचा पवित्र भिक्खू संघ समता सैनिक दल महार रेजिमेंट सैनिक भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी बौद्धनगर मधील सर्व उपासक-उपासिका भिमसैनिक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मिरवणूक आयोजित केली. या मिरवणुकीमध्ये सिद्धार्थ तरुण मंडळ निंबळकमधील लहान भीमकन्या यांचा डान्स विशेष आकर्षण होते. तसेच भीमरत्न तरुण मंडळ मुंजवडी यांच्या वतीने यावर्षी ‘नो डीजे, नो फटाका, ओन्ली बाबासाहेब का धमाका’ असे नियोजन केल्यामुळे सर्व भीमसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणूक अतिशय शांततेत महामानवाच्या घोषणा देऊन बौद्धमय वातावरणात पार पडली. दि. २९ एप्रिल २०२४ रोजी युवा संस्कार श्रामणेर शिबिराचा समारोप समारंभ पूज्य भंतेजींच्या हस्ते पवित्र भिख्खू संघास प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते झाला.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, मुंजवडी गावचे सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष, मान्यवर तसेच सर्व उपासक-उपासिका, भीमसैनिक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व भीमसैनिकांचे खूप सहकार्य लाभले. धम्मदान दात्यांचे भीमरत्न तरुण मंडळ, मुंजवडी यांच्यावतीने आभार मानण्यात आले.