युवा नेते धैर्यशील मोहिते-पाटील माढ्यातून इच्छुक; पायाला भिंगरी, गावोगावी दौरे, भेटीगाठी वाढल्या


दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने युवा नेते धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक आहेत. त्यांनी याबाबत पक्षाकडे मागणी सुद्धा केलेली आहे. या मागणीमुळे भारतीय जनता पार्टीसमोरचा पेच वाढणार असून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही माढ्यातून पुन्हा शड्डू ठोकायला तयार असल्याने कोणाला तिकिट द्यायचे, हा प्रश्न उभा राहणार आहे.

२०२४ च्या लोकसभेसाठी या मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार असून माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. संपूर्ण माढा लोकसभा मतदारसंघ मोहिते पाटील यांनी पिंजून काढलेला आहे.

सध्या धैर्यशील मोहिते पाटील हे गावोगावी दौरे करत आहेत, तर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी देखील पुन्हा मीच, असं म्हणत गाठी भेटी सुरू केल्या आहेत. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील या मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघांमधील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांच्या प्रत्येक समारंभाला धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित राहत आहेत. यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये असणार्‍या विविध कार्यक्रमांना सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित राहत आहेत. धैर्यशील मोहिते पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघामधील सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीला सुद्धा दररोज उपस्थिती लावत आहेत.

माढा मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यातील काही तालुके आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश होतो. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला आणि माढा हे चार विधानसभा मतदारसंघ येतात, तर सातारा जिल्ह्यातील माण-खटाव आणि फलटण हे दोन विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात येतात. त्यामुळं या मतदारसंघात अटीतटीची लढत होते.

माढा मतदारसंघात सहा आमदार असून माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे बबनदादा शिंदे, करमाळ्यातून संजय मामा शिंदे (अपक्ष, अजित पवार गटाला पाठिंबा), सांगोल्यातून शहाजीबापू पाटील (शिवसेना, शिंदे गट), माळशिरसमधून राम सातपुते (भाजप), माण-खटाव मतदारसंघातून जयकुमार गोरे (भाजप) व फलटण विधानसभा मतदारसंघातून दिपक चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट) हे आमदार आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघात माण, सांगोला हे परंपरागत दुष्काळी तालुके या मतदारसंघात आहेत. येथे पाणीटंचाई खूप आहे. सिंचनाची कामे होत असली तरी त्याचा वेग कमी आहे. माढा मतदारसंघात साखर कारखानदारी असली तरी ती सध्या आर्थिक अडचणीत आहेत. काहीच कारखाने उसाला चांगला दर देत आहेत. अन्य कृषीमालाचे दर कमी आहेत. सुशिक्षित बरोजगारी खूप आहे. त्यामानाने कृषी अधारित अन्य व्यवसाय व उद्योग येथे आले नाहीत. सहकारी संस्था अडचणीत असल्याने आता नोकर्‍यांची संख्या रोडावली आहे. मोठ्या शिक्षणाच्या सुविधा मतदारसंघात नाहीत. तसेच मतदारसंघात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था चांगली नाही. माढा तालुक्यातील काही भाग, तसेच करमाळा तालुक्यातील काही भागात अद्यापही पाण्याच्या समस्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!