दैनिक स्थैर्य । दि. 03 जुलै 2021 । फलटण । फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदीरमध्ये शिक्षकांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासनांचे विविध प्रकार करुन जागतिक योग दिन साजरा केला.
यावेळी खडे आसन, भुजंगासन, ताडासन, पर्वतासन, वक्रासन, बैठे आसन, उत्तरासन, वक्रासन, वज्रासन, पद्मासन, शवासन, कपालभारती, अनुलोमविलोम, शीतली प्राणायम, ध्यानासन आदी योगासने विद्यालयातील योग शिक्षकांच्या व तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
‘‘कोरोनाच्या महामारीत नियमित योगसाधनेला अत्यंत महत्त्व आहे. तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून योगसाधना करुन घेण्यासाठी योग दिनाचा उपक्रम शिक्षकांना उपयुक्त ठरेल’’, असे यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांनी सांगितले.