प्रश्‍न ओळखून त्यावरचं उत्तर शोधायला यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला शिकवलं : पद्मश्री लक्ष्मण माने


दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । ‘‘आपला समाज उभा करण्यासाठी आपणचं प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या प्रश्‍नांना आपण भिडलो तरच ते सुटतील; याची शिकवण यशवंतराव चव्हाणांकडून मिळाली. यशवंतराव चव्हाणांबरोबर जाण्याचा मी निर्धारपूर्वक निर्णय घेतला. यातून आपल्या समाजाला काय हवं आहे त्या दिशेला आपण जावू याची खात्री पटली. क्रांती होईल का नाही ते माहित नव्हतं, केव्हा होईल हे सांगता येत नव्हतं पण आजचे प्रश्‍न ओळखून त्यावरचं उत्तर शोधायला यशवंतराव चव्हाणांनी आम्हाला शिकवलं. कार्यकर्त्यांच्या सुख-दु:खामध्ये, कार्यकर्त्यांच्या जगण्या-मरण्यामध्ये संगत आणि पगंत असणारे असे यशवंतराव चव्हाण होते’’, असे भावपूर्ण उद्गार ‘उपरा’कार पद्मश्री लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले.

येथील नामदेवराव सूर्यवंशी-बेडके महाविद्यालयात थोर नेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत श्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरु प्रतिष्ठान, फलटण यांच्या सहकार्याने महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा फलटण आयोजित दहाव्या ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलना’मध्ये ‘यशवंतराव चव्हाण आणि माझी जडणघडण’ या विषयावर पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मुलाखतकार ताराचंद्र आवळे यांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उत्तर देताना ते आपल्या आठवणींना उजाळा देत होते.

‘‘यशवंतराव चव्हाणांसोबत माझे राजकारणाच्या पलिकडे कुटुंबवत्सल ऋणानुबंध होते. चव्हाण साहेब नसते तर मी फार तर खांद्याला झोळी अडकवून भाषणे करत, मोर्चे काढत फिरलो असतो. शिक्षण संस्था चालवण्याचा माझा पिंड नाही, ते मी करु शकणार नाही असे आपण त्यांना सांगितले होते. पण त्यावेळी मी पाठीशी आहे तुम्ही काळजी करु नका असे ठामपणे सांगून भटक्या – विमुक्तांच्या शिक्षणाचे कार्य तुम्हालाच सुरु करावं लागेल असे चव्हाण साहेबांनी आपल्याला सांगितले. आज 50 हजारहून अधिक भटक्या – विमुक्तांचे शिक्षण माझ्या संस्थेतून पूर्ण झाले आहे. चव्हाण साहेबांचे आशिर्वाद नसते, पुढे शरद पवारांशी मी जोडला गेलो नसतो तर हे शक्य नव्हते’’, असेही पद्मश्री लक्ष्मण माने यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

पद्मश्री लक्ष्मण माने यांनी त्यांच्या आंतरजातीय विवाहामुळे पत्नीची त्यांच्या माहेरच्यांसोबत निर्माण झालेली कटूता यशवंतराव चव्हाण यांनी पुढाकार घेऊन कशी संपुष्टात आणली आणि त्यांना त्यांचे दुरावलेले माहेरपण कसे मिळवून दिले हा भावस्पर्शी प्रसंग सांगून, ‘‘जाती-पाती या कृत्रिम गोष्टी आहेत. त्या खर्‍या नसून कुणीतरी आपल्या पोटा-पाण्यासाठी निर्माण केल्या आहेत. यातून सर्वांनी बाहेर पडणं गरजेचे आहे’’, असेही माने यांनी यावेळी सांगितले.

प्रारंभी ‘संविधान दिना’निमित्त पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर 26/11 च्या मुंबईवरील हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी लक्ष्मण माने यांचे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य रविंद्र बेडकिहाळ, संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, म.सा.प.फलटण शाखा अध्यक्ष प्राचार्य शांताराम आवटे यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषद, श्रीराम एज्युकेशन सोसायटी, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यप्रेमी नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!