साहित्यिकांनी आपले साहित्य इंग्रजीत अनुवादित करावे : साहित्यिक सुरेश शिंदे


दैनिक स्थैर्य | दि. ३१ मे २०२४ | फलटण |
साहित्यिक आपल्या बोली भाषेत विपुल लेखन करतात. हे साहित्य त्या त्या भाषेपुरते, राज्यापुरते, प्रांतापुरते, भागापुरतेच मर्यादित राहते. जगाचा विचार करता, इंग्रजी भाषा जागतिक व्यवहाराची भाषा ठरली आहे. आपले लिखाण कितीही कसदार असले तरी ते जागतिक भाषेत अनुवादित करून घेतले पाहिजे. आपली मातृभाषा आपला आत्मा असला तरी इंग्रजी जगाची भाषा आहे. त्यामुळे साहित्यिकांनी आपले साहित्य इंग्रजीत अनुवादित करावे, असे मत प्रमुख वक्ते, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश शिंदे यांनी जैवविविधतेने नटलेल्या नाना-नानी पार्क, फलटण येथे साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण व वन विभाग, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या साहित्यिक संवाद या कार्यक्रमात व्यक्त केले.

यावेळी संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, श्रेयश कांबळे, रानकवी राहुल निकम,डॉ. सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरेश शिंदे पुढे म्हणाले की, साहित्यिक साहित्याची निर्मिती करतात. मात्र, ती जगाच्या बाजारपेठेत पाहावयास मिळत नाहीत. आपले साहित्य अनुवादित होत नसल्याने विमानतळ, रेल्वे स्टेशन व मोठमोठ्या ग्रंथ भांडारात मिळत नाहीत. त्यामुळे कसदार साहित्य निर्माण करून ते जागतिक पातळीवर कसे पोहोचेल याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी झाडे किती लावली, यापेक्षा किती झाडे जगवली हे कसे महत्त्वाचे आहे व वन वाढीसाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, हे सांगून ‘आनंदी जीवन जगती’ ही कविता सादर केली व काव्य मनाला कसे तरुण बनवते यावर भाष्य केले.

स्व. सुलेखा शिंदे लिखित ‘मालकाच खातं’ ही कादंबरी साहित्यिक संवाद यास अर्पण केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला व तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

श्रेयश कांबळे यांनी ‘एका काडीतून क्रांती’ या पुस्तकावर भाष्य करून सेंद्रिय खत व खाद्य यावर दीर्घायुष्य कसे अवलंबून आहे, हे स्पष्ट केले. युवा कवी अविनाश चव्हाण यांनी ‘जीवनाचे उत्तर’ व ‘आस’ या कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.

प्रास्ताविक व स्वागत राहुल निकम यांनी केले, तर डॉ. सुधीर इंगळे यांनी ‘जे भावल ते लिव्हल’ हे सांगून सर्वांचे आभार मानले.

यावेळी साहित्यिक व फलटणकर साहित्यप्रेमी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!