दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२४ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजाळे, मिंडवस्ती, गोखळी, पवारवाडी, खटकेवस्ती, आसू येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये २१ जून जागतिक योग दिनानिमित्त इयत्ता बारावीमधील विद्यार्थिनींनी ताल योग याचे सादरीकरण केले.
तालुक्याच्या पूर्व भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारप्राप्त श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या जानाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये योग प्रशिक्षक गजानन काळेबेरे व गौतम भोसले यांनी योगासनांची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निळकंठ निंबाळकर सर यांनी केले. प्राचार्या सौ. गायकवाड यांनी योगदिनाच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच नियमित योगासने व प्राणायाम आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती दिली.
यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
गोखळी येथील हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्ताने विद्यालयातील उपशिक्षक किरण पवार सर, सुनील जाधव सर यांनी योगासने व प्राणायाम आरोग्यासाठी महत्त्वाचे असून ते नियमितपणे करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करून योगासने आणि प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली.
पूर्व भागातील ज्योतिर्लिंग हायस्कूल पवारवाडी, सरलष्कर खर्डेकर विद्यालय आसू, हणमंतवाडी माध्यमिक विद्यालय आणि पवारवाडी, ढवळेवाडी, मिंडवस्ती (साठे), जाधववाडी, खटकेवस्ती, पंचबिघा, जगतापवस्ती, शांतीदासनगर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योगासने आणि प्राणायाम प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांसमोर सादर करण्यात आली.