दैनिक स्थैर्य | दि. ४ डिसेंबर २०२३ | बारामती |
जागतिक अपंग दिनानिमित्त रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी जागृती अपंग विश्वस्त संस्थेच्या वतीने बारामती शहरातील गुणवडी चौक येथे अपंग व दिव्यांग दिनानिमित्त अपंग व दिव्यांग यांना शालेय वस्तूंचे व रग, ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी बारामती बँकेचे चेअरमन सचिन सातव, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, नायब तहसीलदार विलास करे, बारामती नगर परिषद दिव्यांग अधिकारी अमर मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक बाळासो जाधव, पंचायत समिती अपंग कल्याण अधिकारी संदीप शिंदे, तलाठी राहुल जगताप व जागृती अपंग विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड, उपाध्यक्ष अजीज शेख, कार्याध्यक्ष विनोद खरात, खजिनदार शेखर जाधव व प्रदीप शेंडे, कैलास शिंदे, दत्ता शिंदे, शिवराज डिस्टवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाच्या जोरावर अपंग व दिव्यांग यांनी विविध क्षेत्रात मिळवलेले यश उल्लेखनीय असल्याचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांनी सांगितले.
अपंग व दिव्यांग यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
समाजातील अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व अन्य प्रकारचे लोक समाजातील अन्य नजरेतून पाहतात, त्यांना समाजात मानाने जगता यावे यासाठी दि. ३ डिसेंबर हा दिवस ‘जागतिक दिव्यांग दिवस’ म्हणून साजरा करतात व बारामतीमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून अपंग व दिव्यांग यांना प्रोत्साहित करत असल्याचे अध्यक्ष दीपक गायकवाड यांनी सांगितले.
याप्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धनराज निंबाळकर यांनी केले तर आभार अजिज शेख यांनी मानले.