स्थैर्य, विडणी, दि. ७: विडणी ता. फलटण येथील उत्तरेश्वर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ज्ञानदानाच्या पवित्र कामामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता दर्जा कसा वाढेल यासाठी काम करावे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य हे कायम आमच्या माध्यमातून राहील, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
विडणी, ता. फलटण येथील महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते. त्या वेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, विडणी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. रुपालीताई अभंग, उपसरपंच नवनाथ पवार, फलटण पंचायत समिती सदस्या सौ. सुशीला नाळे त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव अभंग, उपाध्यक्ष हरिभाऊ शिंदे, संस्थेचे सचिव सहदेव शेंडे तसेच संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, एकपात्री नाटक स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच एन. एम. एम. एस. स्कॉलरशिप, नवोदय परीक्षेतील विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थेचे सचिव सहदेव शेंडे यांनी केले तर सूत्रसंचालन सौ. रुपाली पवार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार बी.जी ननावरे यांनी मानले.