स्थैर्य, दि.३०: जपानमधील एका महिलेने तिच्या आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याची घटना उघडकीस आलीय. जपानमधील पोलिसांनी या महिलेला अटक केलीय. युमी योशिनो असं या अटक केलेल्या महिलेचं नाव असून, ती 48 वर्षांची आहे.
स्थानिक माध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युमी योशिनो यांना त्यांच्या आईचा मृतदेह सापडला आणि त्यांनी 10 वर्षे लपवून ठेवला. कारण त्यांना टोकियोच्या बाहेर जायचं नव्हतं. मृतदेह पूर्णपणे गोठलेला होता. त्यामुळे त्यावर कुठलीही जखम दिसत नव्हती, असंही पोलिसांनी सांगितलं. तपास करणाऱ्या पथकाला महिलेच्या मृतदेहाची वेळ आणि कारण अद्याप कळू शकलं नाहीय.
एका सफाई कामगारामुळे फ्रीझरमध्ये मृतदेह ठेवला असल्याचं समोर आलं. घराचं भाडं भरू न शकल्यानं युमी योशिनो यांना घर सोडण्यास सांगितलं गेलं. त्यानंतर त्यांच्या घराची सफाई करण्यासाठी गेलेल्या कामगाराला हा मृतदेह फ्रीझरमध्ये आढळला.
फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी मृतदेहाला तसं दुमडण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. युमी योशिनो यांना टोकियोजवळील चिबा शहरातील एका हॉटेलमधून शुक्रवारी (29 जानेवारी) अटक करण्यात आली.