
दैनिक स्थैर्य । दि. २२ जून २०२२ । सातारा । शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारल्याने महाविकास आघाडीत शिवसेनेची अडचण झाली आहे. शिवसेनेत दोन गट पडले आहेत. ठाकरे सरकार अस्थिर होण्याच्या मार्गावर आहे. हे भाजपच्या लोटस ऑपरेशनचा एक भाग असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या असल्याने साताऱ्यातील शिवसैनिक संतप्त होत त्यांनी पोवईनाक्यावर एकत्र येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शविला.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याची व्यूहरचना भाजपने आखली आहे. त्यानुसार शिवसेनेचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंड पुकारत सुरतला रवाना झाले आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या आमदार व प्रमुख नेत्यांची तातडीची बैठक घेऊन एकनाथ शिंदे यांना गट नेते पदावरून दूर केले आहे.
या सर्व घडामोडी सुरू असताना सातारा जिल्ह्यातील शिवसेनेचे प्रमुख नेते मुंबईला रवाना झाले आहेत. तर उर्वरित शिवसैनिकांनी सायंकाळी ६ वाजता पोवईनाका येथे एकत्र येत रस्त्यावर बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठींबा दर्शविला. शिवसेना जिंदाबाद, जय भवानी..जय शिवाजी., उद्धव साहब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है.., आवाज कुणाचा…शिवसेनेचा, अशी घोषणाबाजी केली.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवईनाका येथील ‘कोयना दौलत’ या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. देसाई हे सुद्धा एकनाथ शिंदेंसोबत असल्याने शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जाऊ लागू नये, म्हणून पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
यावेळी युवा सेनेचे सातारा शहर प्रमुख सचिन मोहिते म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला एकच शिकवण दिली आहे. २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण असून आम्ही ती नेहमी पाळतो. यामध्ये शिवसेना ही चार अक्षरे, आमचे चिन्ह धनुष्यबाण व तिसरी गोष्ट पक्षप्रमुखांचे आदेश तंतोतंत पाळणे. सातारा जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक व सर्व पदाधिकारी या कठीण प्रसंगामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठशी ठामपणे उभे आहेत. कोणाच्याही मनात व्दिधा अवस्था नाही. आम्हाला पक्ष प्रमुख देतील तो आदेश आम्ही तंतोतंत पाळू. यावेळी उपजल्हिाप्रमुख प्रताप जाधव, सचिन मोहिते, तालुकाप्रमुख दत्तात्रय नलावडे, सचिन झांजुर्णे, उपतालुकाप्रमुख रमेश बोराटे, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, उपशहरप्रमुख गणेश अहिवळे, अभिजीत सपकाळ, संजय जाधव, अमोल खुडे, सचिन जगताप, निलेश चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.