स्थैर्य, फलटण, दि. 21 : महाराष्ट्रात एका दिवसात साडेपाच हजाराच्या घरात नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. मुंबई महापालिकेने कोरोनासाठी कठोर नियमावली जाहीर केलीय. यात अनेक निर्बंध घातले गेलेत. तसंच नियम मोडणाऱ्यांवर कारवाईसाठी अतिरिक्त मार्शल्सची नेमणूक करून त्यांना तश्या सूचना दिल्या गेल्या आहेत. विदर्भातले आकडे वाढत आहेत. यवतमाळ, अमरावती आणि अकोल्यात कंटेनमेंट झोन्सची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य सचिवांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत, या सगळ्यावरूनच आता पुन्हा लॉक डाउनच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत कि काय ? असा प्रश्न उभा राहत आहे.
२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च २०२० रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे. आजअखेर फलटण तालुक्यामध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्णांची संख्या ५८७३ इतकी नोंद झाली असून त्यामधील १६४ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर ५७०९ जण कोरोना मुक्त झालेले आहेत.
सध्या फलटण तालुक्यामध्ये कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेले कोव्हीड केअर सेंटर सुरु नाही. फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बरोबर खाजगी हॉस्पिटलमधील डॉ. जे. टी. पोळ यांच्या निकोप हॉस्पिटल, लाईफलाईन हॉस्पिटल व सुविधा हॉस्पिटल येथेच फक्त कोरोना बाधित रुग्णांना दाखल करून उपचार केले जातात. फलटण शहराशेजारी असणाऱ्या जाधववाडी येथील संस्थामक विलीगीकरण सध्या सुरु असून शेती शाळा व इतर ठिकाणी असणारे संस्थामक विलीगीकरण सध्या बंद ठेवण्यात आलेले आहे. आगामी काळामध्ये जर कोरोना रुग्णांचे उपचार हे संस्थामक विलीगीकरण कक्षात करायचे झाल्यास फलटण मधील काही कार्यालये, हॉस्पिटल व हॉटेल्स घेऊनच शासकीय इतमातात संस्थामक विलीगीकरण करावे लागणार आहे.
फलटण तालुक्यामध्ये साधारणतः प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ५ रुग्णांना उपचार देण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. जगदाळे यांनी दिलेली आहे.
सध्या राज्यासह सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या वाढण्याची कोणकोणती कारणे असू शकतात याचा थोडक्यात घेतलेला आढावा…..
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये गहाळ पडलेली सरकारी यंत्रणा – कोव्हिड-19 हा संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये झपाट्याने पसरणारा. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणं महत्वाचं आहे. सुरवातीच्या काळामध्ये प्रत्येक कोरोना रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगल्या प्रकारे केले जात होते. परंतु जस जस अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली तसं तसं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मध्ये गहाळ पणा आलेला आहे. सुरवातीच्या काळामध्ये सर्व शासकीय यंत्रणांचा समन्वय होता. परंतु आता शासकीय यंत्रणांचा एकमेकांत समन्वय दिसून येत नाही.
सुरू झालेले लग्न समारंभ – लॉकडाऊन उघडल्याने राज्यात मोठ्या संख्येने लग्न समारंभ होऊ लागलेत. लग्नात 50 लोकांना परवानगी असताना मोठ्या संख्येने लोकांची हजेरी दिसू लागली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे देखील कोरोनासंसर्ग पसरण्याचं एक प्रमुख कारण आहे. सुरवातीच्या काळामध्ये कार्यालयात किंवा हॉटेल मध्ये कमी लोकांमध्ये लग्न समारंभ होत होते. परंतु आता पुन्हा जास्तीची गर्दी करत लग्न समारंभ होत आहेत आणि या कडे कोणत्याही शासकीय यंत्रणेचे लक्ष नाही, असे दिसून येत आहे.
ग्रामपंचायत निवडणुका कोरोना वाढीसाठी कारणीभूत ? – फलटण तालुक्यामध्ये सुमारे ८० हुन अधिक तर संपूर्ण राज्यामध्ये १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. लोक प्रचार, मतदान यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. शहरांमध्ये काम करणारे लोक मतदानासाठी ग्रामीण भागात गेले. प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. लोकांची सरमिसळ झाली. अमरावती, साताऱ्यातील ग्रामीण भागात काही पॉकेट्समध्ये कोरोनाच्या केसेस वाढलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाल्या.
आजाराबद्दल लोक गांभीर नाहीत – लोक पूर्वी सतर्कता पाळत होते. नियमांच पालन करत होते. आता परिस्थिती बदलली आहे. लोक नियम पाळताना दिसत नाहीत. नियम न पाळल्यास कडक निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला आहे. तरी आता नियम न पाळण्यावर स्थानिक प्रशाशन काय करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्थानिक प्रशासनाने जर कठोर उपाययोजना आमलात आणल्या नाहीत तर कोरोना पुन्हा पूर्वी पेक्षा जास्त प्रमाणात थैमान घालेल व त्या वर सहजासहजी नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही.