निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ सप्टेंबर २०२२ । मुंबई । पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वन जमिनीवर इको पार्क तयार करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, निसर्ग पर्यटन महामंडळाचे व्यवस्थपकिय संचालक विकास गुप्ता, निखिल गांधी यांच्यासह उपस्थित होते.

श्री. मुनगंटीवार म्हणाले, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संतुलन ही सामाजिक जबाबदारी आहे असे समजून काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यात विपुल वनसंपदा असून या माध्यमातून काही नविनतम लोकोपयोगी प्रयोग करता येतील का असा सतत विचार मनात येतो, त्यातूनच ही इको पार्क ची संकल्पना असून वन कायदा, अधिकार आणि इतर सर्व नियमांची शहनिशा करुन, आवश्यक ती पूर्तता करुन जागतिक दर्जाचा इको पार्क महाराष्ट्रात व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रसंगी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान, याविषयातील अनुभवी तज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.

मुंबई हे जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई आणि परिसरातील विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने काम करण्याची इच्छा श्री.मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.


Back to top button
Don`t copy text!