बिहारचा नेता कोण? काँग्रेस आमदारांमध्ये तुंबळ हाणामारी


 

स्थैर्य, पाटणा, दि.१४: बिहार विधानसभा
निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसत नाही तोच अवघ्या 19 जागा जिंकलेल्या
काँग्रेसमध्ये नेता कोण बनणार यावरून तुंबळ हाणामारी पहायला मिळाली आहे.
धक्कादायक म्हणजे आमदारांमध्येच हा राडा झाला आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवीन
सरकार बनण्यावरून रस्सीखेच सुरु झाली आहे. तिकडे भाजपाचे नेते कमी जागा
जिंकलेल्या नितीशकुमारांना मुख्यमंत्री पद देण्यावरून वक्तव्ये करत आहेत.
तर नितीशकुमार यांनी देखील वाहते वारे पाहून एनडीए मुख्यमंत्री ठरवेल असे
म्हटले आहे. तर दुसरीकडे राजदने एनडीएतील मित्रपक्षांना आपल्याकडे
खेचण्यासाठी जोर लावला आहे. अशातच काँग्रेसनेही आज नवनियुक्त आमदारांची
बैठक बोलावली होती.

काँग्रेस आमदारांच्या या बैठकीत शुक्रवारी
मोठा राडा झाला. बैठकीमध्ये आमदार विजय शंकर दुबे यांना चोर म्हटल्याने
मोठा गोंधळ उडाला होता. काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात सदाकत आश्रममध्ये
या नव्या आमदारांची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी दोन गटांत मोठा राडा
झाला आणि शिवीगाळही करण्य़ात आली.

महाराजगंजहून आमदार विजय शंकर दुबे आणि
विक्रमचे आमदार सिद्धार्थ यांच्यामध्ये काँग्रेसच्या गटनेता कोण होणार
यावरून बाचाबाची झाली. यावेळी सिद्धार्थ गटाच्या आमदारांनी दुबेंना चोर
म्हटले. यामुळे संतापलेल्या झालेल्या दुबे गटाने थेट हाणामारीला सुरुवात
केली. दोन्ही गट एकमेकांना भिडले.

यानंतर नेत्यांमध्ये राडा झाल्याचे कळताच
बाहेर उभे असलेल्या कार्यकर्त्यांनीही बैठकीकडे धाव घेतल्याने गोंधळाचे
वातावरण निर्माण झाले होते. यावेळी दोन्ही बाजुच्या कार्यकर्त्यांनी जोरदार
घोषणाबाजी केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!