स्थैर्य, खटाव, दि.१३: राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मध्ये खटाव तालुक्यातील तहसीलदार यांची बदली झाली असून सुमारे दहा दिवस उलटून गेले तरी खटाव ला तहसीलदार हजर झाले नाही,विद्यार्थी व जनतेची अनेक कामे खोळंबली असल्याने खटाव ला त्वरित तहसीलदार देण्याची मागणी माजी सभापती संदीप मांडवे यांनी पालकमंत्री ना बाळासाहेब पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सद्यस्थितीत खटाव तालुक्यात तहसीलदार पदांसह नायब तहसिलदार ची तीन पदे रिक्त आहेत, निवडणूक शाखेचे नायब तहसिलदार सिताकांत शिर्के एकमेव सर्व कामकाज बघत आहेत,मात्र त्यांना सहीचा अधिकार नसल्याने ते इतर शाखेतील काम करू शकत नाहीत. यातच आता विद्यार्थी,पालक यांना लागणारे दाखले,तसेच इतर सर्व कामे खोळंमबली आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर ही अधिकारी नसल्याने अनेक अडचणी येत आहेत.तालुक्यातील अनेक गावातून शालेय विद्यार्थी, पालक तसेच शेतकरी विविध दाखले,महसूल ची कामे करण्यासाठी येत असून तहसीलदार नसल्याने व नायब तहसिलदार यांना सही चा अधिकार नसल्याने सर्व कामे अडली आहेत. तरी खटाव ला तहसीलदार व महसूल ची इतर पदे त्वरित भरावीत,अशीही मागणी यावेळी करण्यात आली.