तशी वेळ आली, तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार; उदयनराजेंचा प्रशासनाला इशारा


स्थैर्य, सातारा, दि.१९ : ग्रेड सेपरेटरचे स्वत:च्या स्टाईलने उद्घाटन करत चर्चेचा बार उडवून देणाऱ्या उदयनराजेंनी आज पुन्हा एकदा तुफान फटकेबाजी करत प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, ग्रेड सेपरेटरच्या शासकीय उद्घाटनाच्या चर्चेचा चिमटा काढत उदयनराजेंनी, बाकीचे रथी-महारथी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाला आले असते तर भाषणं झाली असती आणि न पाहताच सांगितलं असतं योगदान किती ते? मी मात्र ‘अभी के अभीच’ म्हणत उद्घाटन केल्याचे वक्तव्य केले. आता कोणीही काही करू द्या उद्घाटन झालेलं आहे. जसं ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन झालं तशी वेळ आली तर मेडिकल कॉलेजचं पण उद्घाटन करणार,  कोण आडवं आलं तर आडवं करणार, असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

साताऱ्यात काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी स्वत:च्या स्टाईलने ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन केले होते. त्यावरून बराच वाद पेटला होता. त्यानंतर आज पत्रकारांशी बोलत असताना उदयनराजे यांनी प्रशासनावर चौफेर तोफ डागली. ‘राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या काळात साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजसह अनेक काम श्रेयवादामुळे रखडले असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. तसंच, शरद पवारांना विनंती करून देखील कोणतेही लोकप्रतिनिधी ग्रेड सेपरेटरच्या भूमिपूजनावेळी आपल्या संकुचित विचार आणि नाकर्त्यापणामुळे आले नाही म्हणून उद्घाटन उरकले, असंही उदयनराजेंनी ठणकावून सांगितले.

दरम्यान, उदयनराजेंनी माजी मुख्यमंत्र्यावर देखील तोफ डोगली. ते म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाचे सरकार होतं त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. त्यावेळी श्रेय वादामुळे मेडिकल कॉलेज रखडले. फडणवीस सरकारच्या काळात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळाली आणि चालना मिळाली. ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांना बोलावे होते. पण कोरोनामुळे कुणीच यायला तयार नव्हते आणि ‘असं कुठं कायद्यात म्हटलं आहे का मंत्री असेल तरच उद्घाटन करायचे. मीसुद्धा खासदार आहे आणि असा तसा नाही भरपूर खाज असलेला खासदार असल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.

त्यामुळे उदयनराजेंच्या चौफर फटकेबाजीचा प्रभाव जिल्हा शासनावर कितपत होणार हे लवकरच कळणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काही दिवसांपूर्वी आदेश काढत ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्घाटन केले जाणार असल्याचे आदेश काढले होते. यावरती उदयनराजेंनी आज जोरदार टीका करत प्रशासनाचा चांगलाच समाचार घेतला.


Back to top button
Don`t copy text!