निरा-देवघरच्या पाणीवाटपासंदर्भात फलटणकर जेव्हा इतिहास वाचतील तेव्हा रामराजेंचा ‘गद्दार’ म्हणून उल्लेख करतील – खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची टीका


दैनिक स्थैर्य | दि. २ मार्च २०२३ | फलटण |
निरा-देवघरच्या पाणी वाटपासंदर्भात जेव्हा जेव्हा इतिहासाचे वाचन होईल, तेव्हा फलटणकर नागरिक रामराजे नाईक निंबाळकर यांचा ‘गद्दार’ म्हणून उल्लेख करतील, असे प्रतिपादन खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बिबी येथील संपर्क दौर्‍यावेळी आयोजित जाहीर सभेत केले.

आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बिबी (ता. फलटण) परिसरात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क दौर्‍याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सांळुखे-पाटील, भाजपा फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, अमरसिंह नाईक निंबाळकर, अमित रणवरे, शंभूराजे बोबडे, सिराजभाई शेख, विशाल नलवडे, दत्तात्रय पवार, गजानन शिंदे, विशाल बोबडे, जगन्नाथ शिंदे, अमोल बोबडे, सचिन बोबडे, लहुराज मोहिते, हिंदराज कदम, हिरालाल सरक, संतोष सावंत, अक्षय पटेल व असंख्य कार्यकर्ते व नागरिकांची उपस्थिती होती.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, सीडब्ल्यूसीने हायड्रोलिक रिपोर्ट बदलून पाणी बारामतीला पळवण्याचा रिपोर्ट दिला आहे. स्वतःचे मंत्रीपद वाचवण्यासाठी रामराजेंनी बारामतीकर नेत्यांचे बूट पुसले आहेत. तसेच त्यांची चाकरी केली आहे. स्वत:ला पाऊण टीएमसीचे ‘भगिरथ’ म्हणवणार्‍यांनी निरा-देवघर धरणाचे फलटण तालुक्याच्या वाट्याला आलेले पाणी बारामतीला देऊ केले. त्यांनी दिलेले पाणी पुन्हा आपण खासदार झाल्यावर आपल्या तालुक्यात वळविले. निरा-देवघरच्या कॅनॉलचे काम करण्याची इच्छा असती तर रामराजेंनी एका दिवसात ते केले असते; परंतु ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना जनतेला फक्त गाजर दाखवायचे होते. रामराजे मला खलनायक म्हणतात. मी जनतेची कामे करतो, त्यांच्या अडचणी, प्रश्न सोडवितो म्हणून ते मला खलनायक उपाधी देतायंत.

अजितदादा पवार यांनी बारामती परिसराचा जसा विकास केला तसा तुम्हाला फलटण तालुक्याचा विकास का करता आला नाही? रेल्वे चालत नाही म्हणून भाषणात ओरडायचे; परंतु ती रेल्वे चालते की नाही हे माझ्या कार्यकर्त्यांनी त्या रेल्वेमधून प्रवास करून दाखवल्यानंतर तुम्ही त्याबाबतीत काहीही बोलला नाही. लवकरच रेल्वेचे टेंडर निघणार असून रेल्वेच्या कामाला गती येणार आहे. कमिन्ससारख्या मोठ्या कंपन्यांमधील तरुणांचा निम्मा पगार त्यांच्या बंगल्यावर जातो तो कसा? उपळवे येथील साखर कारखाना, नाईकबोमवाडी येथील एमआयडीसी होणार नाही आणि जर हे झालेच तर ते जगातील आठवे आश्चर्य असेल, असे ते उपरोधिक बोलत होते. परंतु उपळवेचा कारखाना गेली आठ वर्ष झाले शेतकर्‍यांच्या सेवेत आहे. तो चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि थोड्याच दिवसात नाईकबोमवाडी एमआयडीसीचेही भूमिपूजन होईल व या परिसरात उद्योग-व्यवसाय सुरू होतील, असाही विश्वास खासदार रणजितसिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

फलटणचा चौफेर विकास फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चालला आहे. आज कोट्यवधींची कामे या मतदारसंघात होत आहेत. भविष्यातील निवडणुकांना सामोरे जाताना त्या निवडणुका पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असेही आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.

दरम्यान, फलटण तालुक्याच्या विकासासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भरघोस निधी आणल्याबद्दल बिबी ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने खा. निंबाळकर यांची पेढ्यांची तुला करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!