स्थैर्य, फलटण दि. 23 : फलटण शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून गजानन चौक व शंकर मार्केट या परिसराची ओळख आहे. मात्र गजानन चौकातील महात्मा गांधी यांचा पुतळा व शंकर मार्केट येथील लोकमान्य टिळक यांचा पुतळा गेल्या अनेक दिवसांपासून शहरात चर्चेचा विषय बनले आहेत. दुरुस्तीच्या कारणास्तव काढण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुन्हा बसवण्यासाठी नक्की कधीचा मुहूर्त निघणार आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून काढण्यात आलेल्या या पुतळ्यांमुळे परिसराची ओळख पालिकेकडून काही अंशी पुसली गेल्याची नागरिकांमधून व्यक्त होत असून पालिकेला या महापुरुषांचा विसर पडला आहे की काय? असा सवालही नागरिक विचारत आहेत. या ठिकाणी तात्काळ पुतळे पुन्हा बसवण्यात यावेत व महापुरुषांचा मान राखावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.