आपल्या सर्वांचा ‘स्थैर्य’ पत्रकारिता क्षेत्रात आपली 22 वर्षांची वाटचाल पूर्ण करत आहे. ‘स्थैर्य’ गेल्या 22 वर्षांपासून फलटणकारांपर्यंत वृत्तसेवा पुरवत आहे. ‘स्थैर्य’ च्या माध्यमातून खरी व वस्तुनिष्ठ बातमी तुमच्या सर्वांपर्यंत पोहचविण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलो आहोत. अर्थातच 21 वर्षांची परंपरा खांद्यावर घेऊन पुढे जात असताना ‘स्थैर्य’चे संस्थापक स्व. दिलीप रुद्रभटे, श्रीमती उमा दिलीप रुद्रभटे व माझे जेष्ठ बंधू चैतन्य दिलीप रुद्रभटे यांनी दैनिक ‘स्थैर्य’च्या संपादक पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. ती तितक्याच कुशलतेने सांभाळणे हे माझ्यासमोर फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान पेलत असताना आपल्या सर्वांची मिळणारी साथ लाखमोलाची आहे. त्यामुळे या वर्षपूर्तीच्या निमित्ताने सर्वात प्रथम वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांचे मन:पूर्वक आभार.
गेल्या वर्षभरात आपण सर्वांनीच ‘ना भूतो, ना भविष्यती’ असा भयानक काळ अनुभवला. ‘कोरोना’च्या जागतिक संकटामुळे आपण सर्वजण मोठ्या दडपणाखाली होतो. मात्र या प्रतिकूल काळामध्ये देखील वस्तूनिष्ठ व खर्या बातम्या देण्याचे काम स्थैर्यने केले. या कठीण काळातून जात असतानाच गत एका वर्षांपूर्वी माझ्यावर अचानकपणे दैनिक ‘स्थैर्य’च्या संपादक पदाची जबाबदारी पडली. आधीच आर्थिक अडचण, त्यात कोरोनाची भर. अशा परिस्थितीत वृत्तसेवेचे व्रत अखंड सुरु कसे ठेवायचे हा भला मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा होता. मात्र घाबरायचं नाही, थांबायचं नाही एवढंच डोक्यात होतं. आणि त्यातूनच काळाची पाऊले ओळखून ‘डिजीटल मिडीया’ हा पर्याय आम्ही निवडला. आणि तो नूसता निवडला नाही; तर त्यात पुन्हा नव्या जोमाने, नव्या उमेदीने उतरुन न्यूज पोर्टलच्या माध्यमातून विश्वासू व खात्रीशीर बातमी पोहचविण्याचे काम सुरु देखील केले.
‘कोरोना’ हे संकट जरी असले तरी या संकटाचे रुपांतर आपण संधीत करु शकतो हे मनाशी पक्के ठरवले. सहसा मिळालेली संधी सोडायची नाही हा माझा स्थायीभाव असल्यामुळे ते जमून देखील गेले. कोरोना काळात सर्व सामान्य नागरिकांना व वाचकांना ‘स्थैर्य’शी डिजिटली कनेक्ट करण्याचा मी प्रयत्न केला आणि त्यास डिजिटल वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. न्यूज पोर्टलच्या सुरवातीच्या काळात म्हणजेच मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात एखाद्या बातमीला हजारो वाचक मिळत असल्याने, आपण जे काम करतोय त्याचे समाधान मिळत होते. पण जसं जसं शिकत गेलो तसं कळलं की इंटरनेटच्या ह्या मायाजाळात एखाद्या बातमीला एक हजार वाचक म्हणजे आपण अजूनही खूप मागे आहोत. त्यानंतर मी स्वतः बातमी जास्तीत जास्त जणांपर्यंत कशी पोहचेल यासाठी काम करायला लागलो. बातमी जर वाचकांपर्यंत पोहचलीच नाही तर त्यामागे घेतलेले सगळे कष्ट वाया जातात. त्यामुळे बर्याच गोष्टी ह्या नव्याने शिकायला मिळाल्या. आधीच सातारा जिल्हा आवृत्ती सुरू करून बंद करावी लागली होती. आर्थिक घडी संपूर्णतः विस्कटून गेलेली होती. त्या वेळचे काही महिने तर कसे काढले हे कोणालाही सांगण्याजोगे नाही. परंतु लहानपणापासून एक गोष्ट ऐकत व वाचत आलेलो आहे की, आपण जर प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश हे नक्की येतच असतं. त्यासाठी आपण प्रामाणिक पणे काम करणे गरजेचे असते. फक्त तेच डोक्यात ठेवले. आणि काम करत राहिलो. आणि आजमितीस आपल्या स्वत:च्या न्यूज पोर्टल बरोबरच वेगवेगळ्या नामांकित डिजीटल प्लॅटफॉर्मद्वारे ‘स्थैर्य’ आपली वृत्तसेवा दिमाखात बजावत आहे. हे निश्चितच समाधानकारक असले तरी; या मागे अनेकांनी केलेले सहकार्य देखील कारणीभूत आहे.
या एक वर्षातील ‘स्थैर्य’च्या डिजीटल पर्वाचा थोडक्यात आढावा घ्यायचा झाला तर तो असा की,
> स्थैर्यचे न्यूज पोर्टल सुरू केले.
> स्थैर्यच्या न्यूज पोर्टलला दररोज साधारणतः सातारा जिल्ह्यातील एक लाख वाचक भेट देत असतात.
> दैनिक स्थैर्य व डेली हंट यांच्यात करार होऊन डेली हंट ह्या लोकप्रिय अॅपवर स्थैर्यच्या बातम्या झळकतात.
> दैनिक स्थैर्य व गुगल न्यूज यांच्यात करार होऊन गुगल न्यूज ह्या जगातील लोकप्रिय वेब, अॅपवर स्थैर्यच्या बातम्या दिसतात.
> दैनिक स्थैर्यचे अँड्रॉइड अँप्लिकेशन दिमाखात गुगल प्ले स्टोअर वर दिसत आहे.
> राज्यातील इतर लोकप्रिय न्यूज पोर्टल प्रमाणे स्थैर्यचे न्यूज पोर्टल अल्पावधीत नावारुपास आले आहे.
ह्या सोबत खूप बदल केलेले आहेत आणि अजून बरेच काम बाकी आहे. फलटण तालुक्याबरोबरच संपूर्ण सातारा जिल्ह्यात ‘स्थैर्य’ पुन्हा एकदा नव्या रुपात, नव्या ढंगात विस्तारत आहे. डिजीटल मिडीयामध्ये रोज नवनवीन बदल होत असतात. त्यामुळे अर्थातच या क्षेत्रात आव्हाने देखील मोठी आहेत. ही आव्हाने पेलत असताना पुढील काळात जेव्हा केव्हा जिल्ह्यातील सर्व न्यूज पोर्टल किंवा न्यूज अॅप्लिकेशनचा सर्वे होईल तेव्हा नक्की ‘स्थैर्य’चे नाव हे एक नंबरलाच असेल, या उद्देशाने पुढेही काम करीत रहायचे आहे.
यासाठी आपल्या सर्वांचे पाठबळ, सहकार्य आणि सदिच्छा या हव्याच….
– प्रसन्न दिलीप रुद्रभटे,
संपादक ‘स्थैर्य’.