दैनिक स्थैर्य | दि. ३ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
काल झालेल्या मेळाव्यातील भाषणावर कोणत्याही वरिष्ठ नेत्यावर कोणीही न बोलून आमची संस्कृती आम्ही दाखवली आहे, पण वाचाळवीर व दीडदमडीचे किताब देणारे महाशय आमचे नगरसेवक दीडदमडीचे असते तर तुमच्या श्रीमंत महाराजांनी लोकसभेच्या चर्चेच्या मेळाव्यात त्यांचा उल्लेख केला नसता. अशोककाका व अनुप शहा यांचा उल्लेख केल्याशिवाय तुमची सभाच पूर्ण होत नाही, यावरच आमची किंमत काय आहे ते समजावे, असा टोला भारतीय जनता युवा मोर्चाचे फलटण शहराध्यक्ष नितीन जगताप यांनी राजे गटाला मारला आहे.
जगताप यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अशोकराव जाधव चारवेळा व अनुप शहा तीनवेळा नगरसेवक झाले आहेत. तुमची लायकी परत त्याच वार्डात उभी राहायची तरी आहे का, हे तपासावे. तसेच दुसर्याने लिहिलेल्या बातम्यांना आपले शीर्षक द्यायचे धंदे बंद करा आणि दिवा कुणाचा विझायला लागला आहे, हे फलटण तालुका चांगले ओळखत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत माढ्याचे खासदार हे रणजितसिंह नाईक निंबाळकरच होणार आहेत, असा विश्वास नितीन जगताप यांनी व्यक्त केला आहे.