दैनिक स्थैर्य | दि. ८ मे २०२४ | फलटण |
तुळजापूरहून शिरवळकडे प्रस्थान झालेली अंबिका मातेच्या सासनकाठीचे गोडगाव, वैराग मालवणी, माढा, हाढुळ स्टेशन, पिंपळनेर शिराळा, सरडेवाडी, निमगाव, केतकी, जंक्शन बेलवाडी (शिंदे मळा), पवारवाडी (जि. पुणे), उद्धट आसू, गोखळी, मेखळी खटकेवस्ती , काळोखे वस्ती (वीडणी) मार्गे फलटणला आगमन झाले. या अंबिका मातेच्या सासनकाठीचे ढोल-ताशांच्या गजरात व भाविक भक्तांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिरवळच्या ग्रामदैवत असलेल्या अंबिका मातेच्या सासनकाठीच्या पायी वारीचे स्वागत रविवार पेठ येथील कदम वाड्यात भक्तीभावाने, रस्त्यावर सडा रांगोळी तसेच फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत करण्यात आले. ‘सदा नंदीचा उदे उदे’, ‘बोल भवानी माते की जय’, ‘आई राधा उदे उदे’च्या जयघोषात पारंपरिक पद्धतीने हे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी कदम परिवारातर्फे अंबिका मातेची खणानारळाने ओटी भरण्यात आली. या अंबिका मातेच्या सासनकाठीसमोर स्त्रियांनी पारंपरिक असे खेळ खेळत हलगी, इतर वाद्यांचा गजर करण्यात आला. यावेळी सासनकाठीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
कदम परिवाराच्या वतीने भाविकभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या महाप्रसादाचा लाभ शेकडो भाविक भक्तांनी घेतला.