भारताच्या प्रवेशद्वारावर मान्सूनचे आगमन तसे उशीराच झाले असले तरी मान्सूनचे स्वागत करू या. यावर्षीचा उन्हाळा जरी दरवर्षी पेक्षा जास्त जाणवला नसला तरी जेव्हा जेव्हा जाणवला तेव्हा मात्र तो नकोसा असेच वाटले. पारा ४६ वर पोहचला हो. हवा गरमच होती. जुनी पिढी सांगत असते पहिले ४२ चे वर ऊन जात नव्हते. रात्री ७ वाजता थंड होवून जायचे. बाहेर या गच्चीवर झोपण्याची मजा काय होती हे समजणार नाही तुम्हाला, वगैरे… वगैरे. बोलणारा बोलतो, ऐकणारा मान डोलवतो अन दोघंही मनावर न घेता एसी या कुलर मध्ये आपला असय्य होणारा उन्हाळा यंत्र निर्मित थंड हवा घेत संपवतात.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येतात आणि जातात. याचे महत्त्व आज पण कळत नाही आपल्याला. आता काही दिवस पावसाळा आहे. आज पर्यंत आपण ज्या काही चुका केल्या त्या चुका सुधारण्याची वेळ समोर येवून उभी ठाकली आहे. पावसाळ्याआधी उन्हाळ्यात जी कामे करायची असतात ती आपण केली कि नाही याचा विचार न करता आता सर्वात आधी पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी कामे करा.
धो-धो बरसणाऱ्या पाऊस धारांचा, वाहणाऱ्या पाण्याला भूजल पुनर्भरण करण्यासाठी काम करा. हे काम एवढे महत्वाचे आहे कि यातून आपल्या अनेक भावी पिढयांचा उध्दार होईल. याकरीता आपण आपल्या घरावर, आपल्या परिसरात, आपल्या मौहल्यात, आपल्या शहरात जे पाणी नद्या-नाल्यांना मिळते त्या पाण्यांना जसे जमेल तसे थांबविण्याचा प्रयत्न करावा. पाणी थांबले कि ते आपोआप ते जमिनीच्या पोटात जिरेल, मुरेल असे प्रयत्न करावेत, त्याचा अर्थ आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं.
आपल्या घराच्या कोपऱ्यामध्ये घरावर पडलेल्या पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब बाजूला एक गड्डा करून त्यामध्ये मुरेल अशी व्यवस्था करावी. जो गड्डा करायचा म्हणजे फार मोठे काही नसून साधारणतः दोन-तीन हजार स्क्वेअर फिट चे घर असेल तर पाणी ज्या दिशेने वाहते, त्या दिशेच्या कोपर्यात सर्व पाणी एकत्र आणून जो गड्डा आपण तयार केला त्यात ते पाणी सोडावे.
हा गड्डा ५ फूट बाय ३ फूट व ६ फूट खोल खोदून त्यामध्ये सर्वात खाली दोन फूट दगडी फाड्या टाकाव्यात, त्यानंतर त्यावर एक फूट दगडी कोळसा टाका, त्यावर एक फूट मोठी गिट्टी टाकावी शेवटी त्यावर एक फूट रेती टाकून जाळीचे झाकण लावावे. अश्या प्रकारे गड्डा तयार झाला की घराच्या छतावरून आणलेले पाणी त्यात सोडावे. हळू हळू त्यात पाणी मुरत जाते. याच प्रक्रियेला जलपुनर्भरण या RAIN WATER HARVESTING म्हणतात.
जो आपल्या घरात, परीसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो त्याला भविष्यात पुरेल एवढे पाणी, वर्षा दोन वर्षाच्या प्रयत्नातून जेव्हा मिळते तेव्हा लक्षात येत असते की रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये जी जादू आहे ही जादू नसून तुम्ही केलेले जलपुनर्भरणच तुमच्या कामी आलेले प्रयत्न या काम आहे. ज्यावेळी सरकारी खाते रस्ते बनवते त्यावेळी सिमेंट रस्ते, महामार्ग बनवताना, त्याच वेळी रेन वॉटर हार्वेस्टिंग ची सोय करणे आवश्यक असते, परंतु आजही शहरातील रस्ते बनताना, महामार्ग बांधतांना या सोयी केल्या जात नाही हे दुर्दैव आहे. तसे पाहिले तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे घराचा नकाशा मंजूर करताना मान्य असते. परंतु खरंच किती लोकांनी घर बांधल्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग ची सोय केली, ही तपासणी शासकीय यंत्रणा न करताच प्रमाणपत्र देत असेल तर ते शासनाची आणि स्वतःशीच गद्दारी करतात असेच म्हणावे लागेल.
आताही वेळ गेलेली नाही….शासनाने, आपण स्वतः पुढे येवून जेथे जेथे आपल्या बिल्डींग आहेत, जागा आहेत, मैदाने आहेत तेथे तेथे जागांचा आकार पाहून रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय करावी. जलपुनर्भरण हा कार्यक्रम पुर्ण क्षमतेने गांवागांवात आमंलात आणल्यास भविष्य काळात, तुमच्या पुढच्या पिढीला हिरवागार निसर्गा सोबतच पाणी कमी पडणार नाही यावर विश्वास ठेवा. आपण जर आज हे प्रयत्न केले नाही तर आज तापत असलेले ऊन 46 अंशांवरून काही वर्षात ४८ अंशावर पोहचेल असे बोलले जात आहे. तसे काही होवू नाही याकरीता आपला सहभाग जलपुनर्भरणासाठी असावा, अन्यथा सर्व काही येणारा काळ सांगेल व आपली पुढील पिढी रोज आपणास दोषी ठरविल्या शिवाय राहाणार नाही.
आता पावसाळा चालू झालेला आहे. यावर्षी पाऊस चांगला पडेल असे मानायला काही हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांनी कोणी रेन वॉटर हार्वेस्टिंगची सोय केली नसेल त्यांनी ती करावी व धो… धो बरसणा-या सरीना जलपुनर्भरणा पर्यन्त पोहोचवावे. मान्सूनच्या शुभेच्छासह आनंद घ्या पावसाचा अन कर्तव्य करा जलपुनर्भरणाचे…
लेखक – जल अभ्यासक, डॉ. शंकररावजी चव्हाण राज्यस्तरीय जलभूषण ( महाराष्ट्र शासन ) पुरस्कार्थी व चला जाणूया नदीला या उपक्रमाचे महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय सदस्य आहे.