पुण्यातील उद्योजकाचा वाढेफाटा येथील अपघातात मृत्यू


दैनिक स्थैर्य | दि. २ जुलै २०२३ | सातारा |
कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या व्यावसायिक युवकाची कार वाढेफाटा (सातारा) येथे शनिवार, दि. १ रोजी पहाटे दुभाजकाला धडकल्याने झालेल्या अपघातात कारमधील व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल बबन लोखंडे (वय ३१, रा. कोयनानगर, चिखली रोड, पुणे) असे अपघातात ठार झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.

याबाबत जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राहुल लोखंडे यांचा पुण्यातील चिखली रोड परिसरात व्यवसाय आहे. शनिवारी मध्यरात्री ते कारने कोल्हापूरहून पुण्याला निघाले होते. वाढेफाटा येथे त्यांची कार दुभाजकाला धडकून तीनवेळा पलटी झाली. अपघातात राहुल यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी व्यावसायिक लोखंडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!