
थेट WhatsApp वर मिळवा
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत वीडमॅट बसवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर एक लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळणार असून, यामुळे तण नियंत्रण व ओलावा टिकवण्यास मदत होणार आहे.
स्थैर्य,सातारा, दि. 28 नोव्हेंबर : फळबाग आणि रोपवाटिका उत्पादक शेतकऱ्यांना वीडमॅट उभारणीसाठी प्रति एकर एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे बागेतील तण नियंत्रणात राहण्यास तसेच जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यास फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
अटी, कागदपत्रे आणि मुदत
शेतकऱ्याच्या 7/12 उताऱ्यावर फळबाग किंवा रोपवाटिकेची नोंद असणे आवश्यक असून, त्यासोबत 8-अ उतारा, आधार संलग्न बँक खाते आणि बंधपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वसंमती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी 15 दिवसांत काम सुरू करून 30 दिवसांत उभारणी पूर्ण करणे गरजेचे आहे.
तपासणी आणि अनुदान वाटप
कृषी विभागाने स्पष्ट केल्यानुसार अधिकृत कंपन्यांकडूनच साहित्य खरेदी करणे बंधनकारक आहे, अन्यथा देयके ग्राह्य धरली जाणार नाहीत व अनुदान मिळणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतर मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडून मोका तपासणी होऊन अनुदानाची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा केली जाईल.



