
थेट WhatsApp वर मिळवा
महाडीबीटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी व सर्व्हरच्या संथ गतीमुळे शिष्यवृत्ती अर्ज रखडले असून, विद्यार्थी व पालकांना ई-सुविधा केंद्रांच्या वारंवार फेऱ्या माराव्या लागत आहेत.
स्थैर्य,सातारा, दि. 29 नोव्हेंबर : राज्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी, सर्व्हरची संथ गती, कागदपत्रे अपलोड न होणे आणि पडताळणीतील विलंब यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले असून, ई-सुविधा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे.
अर्ज प्रक्रियेतील अडथळे आणि आर्थिक भार
कागदपत्रे अपलोड होत नसल्याचा तसेच अर्ज पडताळणीच्या टप्प्यात अडकून पडल्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांना येत आहे. त्रुटी दुरुस्त करणे आणि पुन्हा कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असून, अंतिम मुदत जवळ येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
विद्यार्थी आणि केंद्रचालकांच्या प्रतिक्रिया
गेल्या दोन आठवड्यांत वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे चार वेळा ई-सुविधा केंद्रात जावे लागूनही अर्ज पूर्ण होऊ शकला नाही, असे विद्यार्थी सागर गवारे यांनी सांगितले. तर पोर्टलवर अर्जासाठी गर्दी वाढल्याने सर्व्हर वारंवार संथ होत असून प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होत असल्याने पात्र विद्यार्थी लाभापासून वंचित राहू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.



